पुण्याच्या बीआरटीत महाआर्थिक घोटाळा ?

March 25, 2011 2:52 PM0 commentsViews: 22

25 मार्च

पुण्यातील वादग्रस्त बीआरटी प्रकल्पाचा आराखडा आय.एल ऍंड एफएस या संस्थेनं अथवा आयटीडीपी या सल्लागार संस्थेनं केल्याचं नसल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. आतापर्यंत या दोन संस्थांनीच हा बीआरटीचा प्रकल्प अहवाल तयार केल्याचं मानलं जात होतं. या नवीन घोळामुळे गेल्या 5 वर्षात या प्रकल्पावर जे 1032 करोड रूपये खर्च झाले तो आर्थिक घोटाळा असल्याचे महानगरपालिकेतील नगरसेवक उज्वल केसकर यांनी म्हटलं आहे. आयआलएफसी आणि आयटीडीपी या दोन्ही संस्थांनी आज महापालिकेत सर्व पक्षीय गटनेत्यांसमोर सादरीकरण केलं त्यातून हा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.

काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुणेमहानगरपालिका आयुक्त महेश झगडे यांची भेट घेऊन पुण्याच्या नागरी प्रश्नावर चर्चा केली होती. या चर्चेत महत्वाचा मुद्दा होता बीआरटीचा उडालेला फज्जा. यानंतर आयुक्तांनी बीआरटी योजना नीटपणे राबवण्याकरता स्वतंत्र सेल नेमण्याची सूचना केली. पीएमपी संचालक मंडळाने बीआरटीबाबत येत्या सोमवारी प्रेझेंटेशन करावे असही आयुक्तांनी सांगितले.

स्थायी समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष भाजपचे गणेश बिडकर यांनी यापार्श्वभूमीवर महापालिकेत बीआरटीची अंमलबजावणी करण्याकरता नेमलेल्या दोन्ही संस्थांना पक्षनेत्यांसमोर आणलं. आय.एलऍंड एफ.एस कंपनीने धक्कादायक खुलासा करताना बीआरटीचा प्रकल्प अहवाल आपण बनवला नसल्याचे सांगताना आतापर्यंत बीआरटीच्या कामांचे टेंडर 3 वेळा फेटाळल्याने जवाहरलाल नेहरू योजने अंतर्गत मिळालेले पैसे वाया जातील असा इशारा दिला.

महापालिकेतील आक्रमक नगरसेवक उज्वल केसकर यांनी बीआरटी हा महाआर्थिक घोटाळा असल्याचे सांगत महापालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासनानं बीआरटी योजनेचे पैसे कशाकरता वापरले याचा जाब विचारताना चौकशीची मागणी केली. तर सत्ताधारी राष्ट्रवादीच्या गटनेत्यानी मात्र बीआरटी योजनेचं समर्थन करून आरोप फेटाळले होते.

2006 देशात सर्वप्रथम पुण्यात मोठा गाजावाजा करत बीआरटी योजना सुरू करण्यात आली. घाईघाईत योजना सुरू केल्याने 11 नागरिकांचे बळी बीआरटी मार्गावरील अपघातात गेले. याचा फटका मागच्या निवडणुकीत काँग्रेसला बसला. 5 वर्षानंतर अजून या योजनेचा पायलट प्रकल्पही पूर्ण झाला नसताना पुण्यातील आणखी 27 रस्त्यावर बीआरटी योजना राबवण्याचा महापालिकेनं निर्णयही जाहीर केला. योजना चांगली असूनही अंमलबजावणीतील बोजवार्‍यामुळे नागरीकांचाही या योजनेवर रोष आहे त्यातच रोज नवीन नवीन घोळ समोर येत असल्याने आधीच वादग्रस्त ठरलेली बीआरटी पुन्हा गोत्यात आली आहे.

close