अजित पवारांनी राजीनामा द्यावा – खडसे

April 20, 2011 9:37 AM0 commentsViews: 1

20 एप्रिल

अजित पवार यांच्या 'दादा' घोटाळ्याच्या गौप्यस्फोटानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे यांनी अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. अजित पवार जलसंपदा मंत्री असतांना झालेल्या घोटाळ्याची बातमी आयबीएन लोकमतने दाखवल्यानंतर आता विरोधकही आक्रमक झाले आहेत.

निवडणूक आयोगापुढे प्रतिज्ञापत्रात अजित पवारांनी आपली ए.जी.मर्कंटाईल कंपनीत असलेली इक्वीटी जाहीर केली नाही. याबाबत आता अजित पवारांनी स्पष्टीकरण द्यावं अन्यथा आम्ही कोर्टात जाऊ असंही विरोधी पक्षनेते एकनाथ खडसेंनी म्हटलंय. तर मनसेचे आमदार बाळा नांदगावकर यांनी आज विधानसभेतही अजित पवारांच्या 'दादा' घोटाळा उपस्थित केलं.

तर आर.आर. पाटील म्हणतात, 'हा कामकाजातला विषय नाही. मनसेला कुठली चर्चा किंवा आरोप करायचा असेल तर त्यांनी नोटीस द्यावी आणि नंतर मुद्दा उपस्थित करावा.'

दिलीप वळसे पाटील म्हणतात, 'उपमुख्यमंत्र्यांना याबाबत काहीही स्पष्टीकरण द्यायचं असेल तर त्यांनी स्पष्टीकरण द्यावं, मी टीव्ही बघितलेला नाही. त्यामुळे त्याबाबत अधिक माहिती घ्यावी लागेल.'

या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आम्ही वारंवार त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही, आम्ही वारंवार फोन लावला पण आम्हाला अजित पवारांकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही.