टू जी प्रकरणी चिदंबरम सहआरोपी नाही :कोर्ट

February 4, 2012 9:27 AM0 commentsViews: 8

04 फेब्रुवारी

2 जी घोटाळ्यात केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांना आज मोठा दिलासा मिळाला आहे. या घोटाळ्यात ए.राजा यांच्यासोबतच चिदंबरम यांनाही सहआरोपी करण्यात यावे ही सुब्रमण्यम स्वामींची याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे. कोर्टाच्या निर्णयामुळे आश्चर्यचकित झाल्याची प्रतिक्रिया स्वामींनी दिली. तर, कोर्टाच्या निर्णयानंतर चिदंबरम यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेऊन चर्चा केली.2 जी घोटाळ्याप्रकरणात चिदंबरम यांच्या सहभागाची चौकशी होणार नाही किंवा त्यांना सहआरोपी केलं जाणार नाही. पतियाळा हाऊस कोर्टाने सुब्रमण्यम स्वामींची याचिका फेटाळात केवळ चिदंबरम यांनाच नाही तर केंद्र सरकारलाही दिलासा दिला.न्यायमूर्ती ओ पी सैनी यांनी आपल्या निकालात म्हटलं आहे,'दूरसंचार धोरणात फेरफार करून आर्थिक फायदा लाटण्यासाठी चिदंबरम आणि ए. राजा यांच्यात काही करार झाला होता, याचे पुरावे नाहीत. त्यांनी कोणतीही मूलभूत भूमिका बजावल्याचेही पुरावे नाहीत. तोडक्यामोडक्या पुराव्यांवरून गुन्हेगारी कट रचला गेल्याचे प्रथमदर्शनी सिद्ध होत नाही.'

निवडणुकीच्या रणधुमाळीतच यूपीए सरकारला दिलासा

दुपारी 12 वाजता न्यायमूर्ती सैनी यांनी स्वामी आणि त्यांच्या पत्नीला त्यांच्या 2 वकिलांसह कोर्टरूममध्ये बोलावून घेतलं. सुरुवातीला त्यांनी पत्रकार, इतर वकील आणि लोकांना कोर्टरूममध्ये यायला मनाई केली. दुपारी दीड वाजता कोर्टरूमचे दरवाजे उघडले. आणि दुपारी 1 वाजून 35 मिनिटांनी न्यायमूर्ती सैनी यांनी स्वामींची याचिका फेटाळल्याचं घोषित केलं. या निकालाविरोधात वरच्या कोर्टात जाणार असल्याचं स्वामींनी सांगितलं आहे.

2 फेब्रुवारी रोजी सुप्रीम कोर्टाने 2 जी चे 122 परवाने रद्द करत चिदंबरम यांचं प्रकरण ट्रायल कोर्टाकडे सोपवलं होतं. 2 ची सुनावणी आता 17 फेब्रुवारीपासून पुन्हा सुरू होणार आहे.भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांमुळे गेल्या काही काळापासून अडचणीत आलेल्या यूपीए सरकारला कोर्टाच्या निर्णयामुळे दिलासा मिळाला. उत्तर प्रदेशातल्या निवडणुकीत प्रचार करण्यासाठीही आता काँग्रेसला उत्साह येणार आहे.शनिवारी दुपारी घडाळ्यात दीडचे ठोके पडले. आणि काँग्रेसने सुटकेचा निश्वास सोडला. 2 जी घोटाळ्यात चिदंबरम यांना सहआरोपी करायला कोर्टाने नकार दिल्याने काँग्रेसला निवडणूक जिंकल्यासारखा आनंद झाला. तसेच विरोधकांवरही कुरघोडी करण्याची एक संधी मिळाली.- कोर्टाच्या निर्णयामुळे टीम अण्णा आणि विरोधकांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचा सामना करण्याचे बळ काँग्रेसला मिळालंय- पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासाठीही हा निर्णय दिलासा देणारा आहे..2 जी घोटाळ्यात चिदंबरम अडकले असते तर पंतप्रधानही अडचणीत आले असते.- यूपीए विरोधात आघाडी उघडलेल्या सुब्रमण्यम स्वामींसाठीही हा धक्का असल्याचे काँग्रेसला वाटतंय.- कोर्टाच्या निर्णयामुळे तृणमूल, राष्ट्रवादी, द्रमुकसारखे मित्रपक्ष काँग्रेसच्या बाजूने राहतील.

केवळ स्वामी यांच्यासाठीच नाही तर भाजपसाठीही हा निर्णय धक्कादायक आहे. भाजपने लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीतच यूपीए सरकारला दिलासा मिळाल्याने आता काँग्रेसमध्ये उत्साह संचारला आहे.

संबंधित बातम्या

निराश नाही पण निर्णयाने आश्चर्यचकित झालो – स्वामी भाजपने चिदंबरम यांची माफी मागावी – सिब्बल निराश नाही पण निर्णयाने आश्चर्यचकित झालो – स्वामी भाजपने चिदंबरम यांची माफी मागावी – सिब्बल

close