ओमर अब्दुल्लांना काँग्रेसचा पाठिंबा

December 30, 2008 4:13 PM0 commentsViews: 6

30 डिसेंबर नवी दिल्लीपल्लवी घोष जम्मू आणि काश्मीरमध्ये सरकार स्थापनेसाठी नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा देण्याचा निर्णय काँग्रेसनं घेतला आहे. ओमर अब्दुल्ला राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील. त्रिशंकू विधानसभेत काँग्रेस किंगमेकरची भूमिका बजावतंय. त्यामुळे सत्तेत सहभागी होण्यासाठीही काँग्रेस पक्षही तेवढाच उत्सुक आहे. नॅशनल कॉन्फरन्स आणि काँगेस युतीमुळे राजकीय वर्तुळात आता नवा दोस्ताना बनलाय. काँग्रेसला नवा सोबती मिळालाय आणि ओमर अब्दुल्लांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची.यापूर्वी पीडीपीनं दिलेल्या धोक्यामुळे काँग्रेसनं यावेळी नॅशनल कॉन्फरन्ससोबत जाणं पसंत केलं. राहुल गांधी आणि ओमर अब्दुल्ला यांच्यातली मैत्री यासाठी उपयोगी पडली. या आधी ओमर अब्दुल्ला यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीं यांची भेट घेतली. त्यानंतर काँग्रेस सत्तेत सहभागी होईल, असं सोनियांनी स्पष्ट केल्याचं सूत्रांनी सांगितलं.उपमुख्यमंत्री काँग्रेसचा असावा, असा प्रस्तावही काँग्रेसनं ओमर यांच्यापुढं ठेवल्याचं समजतंय. पीडीपी हा केंद्रात युपीअेचा घटक पक्ष आहे. काँग्रेसनं नॅशनल कॉन्फरन्सशी हातमिळवणी केल्यानं पीडीपी नाराज आहे. ओमर यांच्यासारख्या स्वच्छ चारित्र्य असेलल्या तरुण मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाचा फायदा आगामी निवडणुकीत होण्याचा विश्वास काँग्रेसला वाटतोय. आता येत्या काही दिवसांत नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसचे नेते एकत्र येऊन सत्ता सहभागाचा आराखडा तयार करतील.

close