टीम इंडिया झाली बे ‘सहारा’ !

February 4, 2012 10:41 AM0 commentsViews: 10

04 फेब्रुवारी

भारतीय क्रिकेट टीमचा मुख्य प्रायोजक असलेल्या सहारा इंडिया कंपनीनं टीमचं प्रायोजकत्व काढण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाबरोबर झालेल्या वादामुळे सहारा इंडियाने हा निर्णय घेतला. तसेच आयपीएलमधील पुणे वॉरियर्स टीमची मालकी रद्द करण्याचा महत्वपूर्ण निर्णयही सहारा इंडियाने घेतला आहे. आयपीएलच्या पाचव्या हंगामासाठी झालेल्या लिलावापूर्वी सहाराने हा निर्णय घेत बीसीसीआयला मोठा झटका दिला आहे. पुणे वॉरियर्सचा कॅप्टन युवराज सिंग याच्यावरुन बीसीसीआय आणि सहारामध्ये वाद सुरु होता. युवराज सध्या दुखापतग्रस्त असून पुढचे किमान सहा महिने तो खेळू शकणार नाही. युवराजच्या जागी इतर खेळाडूची निवड करण्याची मागणी सहाराने केली होती. मात्र बीसीसीआयकडून सहाराची ही मागणी धूडकावण्यात आली. यानंतर सहारा इंडियाने हा निर्णय घेतला. तसं पत्र त्यांनी बीसीसीआयला पाठवलं आहे. बीसीसीआयला आणि खेळाडूंना आपल्याला वेठीस धरायचं नाही असं सहाराने बीसीसीआयला पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे. येत्या 2-4 महिन्यात बीसीसीआयला नवीन स्पॉन्सर मिळेल असा विश्वासही सहाराने व्यक्त केला. आयपीएल टीमच्या खेळाडूंना, कोचना आणि इतर सदस्यांना त्यांची राहिलेली रक्कम मिळेल असं सहाराने स्पष्ट केलं आहे. सहारा इंडिया आणि बीसीसीआयमधला प्रायोजकत्वाचा करार 2010 मध्ये संपल्यानंतर पुन्हा चार वर्षांसाठी प्रायोजकत्वामध्ये वाढ करण्यात आली होती. यासाठी सहारा इंडियाने तब्बल 450 कोटी रुपये मोजले होते.

दरम्यान, बीसीसीआयकडून या प्रकरणी पहिली अधिकृत प्रतिक्रिया आलीय ती आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांच्याकडून. सहारा कंपनीने बीसीसीआयला लेखी स्वरुपात काही कळवलेले नाही. तसे त्यांनी कळवले की आम्ही यावर निर्णय घेऊ असं शुक्ला यांनी म्हटलं आहे.

close