पवारांच्या काँग्रेसला कानपिचक्या !

May 9, 2013 1:25 PM0 commentsViews: 41

आशिष जाधव, मुंबई

09 मे

काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधल्या वादाने आणि कुरघोडीच्या राजकारणाने नव्याने उचल खालली आहे. राष्ट्रीय राजकारणावर डोळा ठेवून शरद पवारांनी राज्यात काँग्रेसला कोंडीत पकडायला सुरुवात केली आहे. कर्नाटकात पूर्ण बहुमत मिळाल्यामुळे काँग्रेसमध्ये आनंदाचं वातावरण असतानाच.. शरद पवारांनी त्यावर विरजण टाकलंय. कर्नाटकातल्या विजयाने काँग्रेसने हुरळून जाण्याआधी पुढच्या निवडणुकाही आहेत हे लक्षात ठेवा असं सुचवत शरद पवारांनी काँग्रेसला पुणेरी हिसका दाखवला.

आगामी लोकसभा त्रिशंकू असेल, असा शरद पवारांचा होरा आहे. त्यामुळे काहीही करून राष्ट्रवादीच्या खासदारांची संख्या पवारांना वाढवायची आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांच्या निर्णयांना आव्हान द्यायला राष्ट्रवादीने सुरूवात केलीय. आधी राष्ट्रवादीच्या राज्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून म्हाडाच्या घरांच्या किंमतीला विरोध केला. मुख्यमंत्र्यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या एलबीटीसंदर्भात मंत्रिगटाची स्थापना करा अशी मागणी करत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाबद्दल अविश्वास दाखवला.

आता एलबीटी, प्राध्यापकांचा संप, दुष्काळ, म्हाडाच्या घरांच्या किमती.. या सगळ्याच विषयांवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये जुंपलीये. म्हणून समन्वय समितीची बैठक तातडीने बोलवण्याची मागणी राष्ट्रवादीने केलीय.

बुधावारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी संपकरी प्राध्यापकांची थकबाकी आकस्मिकता निधीतून देण्याचा प्रस्ताव फेटाळून शरद पवारांच्या मध्यस्थीलाच छेद दिला. राष्ट्रवादीने सुरू केलेल्या कुरघोडीच्या राजकारणाला काँग्रेसही प्रत्युत्तर देत असल्यामुळे हा वाद आता निवडणुकांपर्यंत चिघळत जाईल, हे स्पष्ट आहे.

close