मुंबई हल्ल्यात सहभाग असल्याची झरार शाहची कबुली

January 1, 2009 4:26 AM0 commentsViews: 15

1 जानेवारी, मुंबई" मुंबईवरचा 26 नोव्हेंबर 2008 मधला भीषण हल्ला ' लश्कर-ए-तोयबा ' या संघटनेनं घडवून आणल्याची जबानी या हल्ल्यात पकडण्यात आलेली आरोपी अजमल कसाब यानं दिली आहे. अजमल कसाबच्या जबानीतली माहिती खरी आहे, " अशी स्पष्ट शब्दांतली कबुली झरार शाह यानं दिली आहे. झरार शहा हा लश्कर -ए -तोयबाचा कमांडर आहे. मुंबई हल्ल्याच्या संदर्भात झरार शह आणि त्याचा साथीदार कमांडर झकी-उर-रहमान लख्वी ला पाकव्यात काश्मिरमधून ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यावेळी त्या दोघांनी मुंबई हल्ल्याची स्पष्ट कबुली दिली.मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंडही झरार असल्याचंही सूत्रांनी सांगितलं आहे. मुंबई हल्ल्याशी लश्कर-ए-तोयबाचा संबंध असल्याची कबुली पाकिस्ताननं पहिल्यांदाच दिली आहे. त्याबाबतची माहिती पाकिस्तान पंतप्रधान कार्यालयातल्या सूत्रांकडून सीएनएन- आयबीएनला मिळाली आहे. झकी-उर-रहमान लख्वी अणि झरार शाह या लष्करच्या अतिरेक्यांनी मुंबई हल्ल्याचा कट रचल्याची आणि ते पार पडल्याची कबुली दिली आहे. मुझफ्फराबादमधल्या लश्करच्या कॅम्पमधून त्यांना या महिन्याच्या सुरुवातीला ताब्यात घेण्यात आलं होतं. अर्थातच पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी या बातमीचं खंडनही केलं होतं. झरार शहानं गुन्ह्याची कबुली दिल्याची पाकिस्तानी अधिकार्‍यांच्या हवाल्यानं वॉल स्ट्रीट जर्नलनं बातमी प्रसिद्ध केली आहे. शाह हा लश्करच्या तांत्रिक विभागाचा प्रमुख आहे. मुंबईतल्या अतिरेक्यांना सल्ला दिल्याचं आणि मार्गदर्शन केल्याचं त्यानं मान्य केलंय. झरार शाह आणि ताजमधला एक अतिरेकी यांच्यातल्या फोनवरच्या संभाषणाचा अमेरिकेनं दिलेला पुरावाही हेच सांगत आहे. त्यादरम्यानअमेरिकच्या FBI या गुप्तचर संस्थेनं पाकिस्तानमधल्या फरीदकोट इथल्या अजमल कसाबच्या घराला चौकशीसाठी भेट दिलीये. FBI चे दक्षिण आशियाचे डायरेक्टर रॉबर्ट विल्यम हे या ग्रुपचे प्रमुख होते. तपासादरम्यान या टीमला कुठलेही पुरावे सापडले नाहीत, असं जीओ टीव्हीच्या सुत्रांनी सांगितलय. दरम्यान कसाब हा पाकिस्तानी असल्याचा बनाव भारतानं रचल्याचा आरोप पाकिस्तानं केला आहे. " मुंबई हल्ल्यात पाकिस्तानी अतिरेकी असू शकतात, पण तसे ठोस पुरावे नाहीयेत, "असं पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जनरल दुरानी यांनी नुकतंच म्हटलं होतं. पाकिस्तानला अतिरेक्यांवर कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे दिल्याचं भारतानं म्हटलंय. " पकडलेला दहशातवादी हाच मुख्य पुरावा आहे. पाकिस्तानला अजून असे किती पुरावे हवे आहेत ? असा प्रश्न माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि तत्कालीन गृहमंत्री पी. चिदम्बरम् यांनी नुकत्याच झालेल्या एका बैठकीत विचारला. "आंतरराष्ट्रीय आदेशानुसार पाकिस्तानाला लष्करावर आणि पाक दहशतवाद्यांवर कारवाई करणं भाग आहे. ती कारवाई करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरून पाकिस्तानवर दबाव टाकण्यात येईल, अशी आशा आहे, '' असं परराष्ट्र राज्यमंत्री आनंद शर्मा म्हणाले.लख्वी आणि झरार शाह यांच्याबाबत पाकिस्तानकडून अधिकृत दुजोरा मिळण्याची भारत वाट पाहत आहे. तोपर्यंत पाकिस्तानवर राजकीय दबाव वाढवण्याचा भारताचा प्रयत्न असणार आहे.

close