रिव्ह्यु :पहिला ‘आशिकी’ बरा होता !

April 26, 2013 4:04 PM1 commentViews: 509

अमोल परचुरे,समिक्षक

26 एप्रिल

आशिकी 2… राहुल रॉय आणि अनु अगरवाल यांच्या आशिकी सिनेमाचा हा रिमेक… तो आशिकी तर प्रचंड गाजला होता. राहुल रॉय आणि अनु अगरवालचा हळुवार रोमान्स आणि मुख्य म्हणजे त्यातली सगळी गाणी सुपरहिट झाली आणि आजही हिट आहेत…आता वीस वर्ष उलटून गेल्यावर पुन्हा तीच जादू रसिकांवर मोहिनी घालेल असं भट्ट कॅम्पला वाटलं असावं, पण त्यासाठी जेवढी मेहनत घ्यायला हवी ती काही त्यांनी घेतलेली नाही. अगदी सुरुवातीपासून हा सिनेमा, त्याची कथा, कलाकारांचा अभिनय आणि त्यातली गाणी, कुठलीच गोष्ट पकड घेत नाही. तटस्थपणे आपण एक रोमँटिक आणि फिलॉसॉफिकल सिनेमा पाहत बसतो आणि बोअर होऊन जातो.

मूळ आशिकी जेव्हा रिलीज झाला तेव्हा राहुल रॉय आणि अनु अगरवाल हे दोघेही नवखेच होते. अभिनयातून त्यांना फार चमक दाखवता आली नसली तरी गाण्यांनी धमाल उडवून दिली होती. नवीन आशिकीमध्ये सुमार अभिनय सावरण्यासाठी काहीच नाहीये. कथेमध्ये खूप चढउतार आहेत, पण त्यामुळे सिनेमा रोचक वगैरे झालेला नाही. दारुत बुडालेला लोकप्रिय गायक राहुल जयकर (आदित्य रॉय कपूर) आणि पार्श्वगायिका बनण्यासाठी धडपडणारी आरोही शिर्के (श्रध्दा कपूर) यांची ही प्रेमकथा आहे. राहुल आरोहीच्या आणि तिच्या आवाजाच्या प्रेमात पडतो. तिची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी सगळे प्रयत्न करतो. आरोही प्रामाणिकपणे मेहनत करुन राहुलपेक्षाही मोठी गायिका बनते पण तोपर्यंत राहुलचं जग दारुत बुडालेलं असतं. मग परत थोडे ट्विस्ट, मग राहुल सुधारतोय असं वाटत असताना पुन्हा ट्विस्ट… आणि एक धक्कादायक शेवट…सगळे प्रयत्न करुनही प्रेक्षकांवर काही मोहिनी वगैरे पडत नाही आणि पहिलाच आशिकी सरस होता असाच विचार आपण करत राहतो.

आदित्य रॉय कपूर देखणा वगैरे वाटत असला तरी त्याचा अभिनय अजिबात देखणा नाही. प्रेमात असताना, दारु पिऊन उद्धस्त झालेला असताना, गाताना, इंटेन्स सीन्स करताना प्रत्येक वेळी त्याच्या चेहर्‍यावर साधारण सारखेच भाव असतात. मध्ये मध्ये तो फरहान अख्तरसारखा अभिनय करायचाही प्रयत्न करतो. त्याच्यापेक्षा शक्ती कपूरची मुलगी श्रध्दा कपूर थोडं बरं काम करते. पण तरी हे दोघेजण फार प्रभाव पाडत नाहीत. आधुनिक काळातली आणि टिपिकल भट्ट कॅम्पची गाणीसुध्दा लक्षात राहत नाहीत. एकच लक्षणीय गोष्ट, मिलिंद फाटक या मराठी अभिनेत्याचं 'रंगरेज'नंतर आता 'आशिकी 2' मधून हिंदीत बस्तान बसताना दिसतंय. बाकी तुम्हाला आदित्य रॉय कपूर आवडत असेल किंवा पहिल्या सिनेमाशी तुलना करुन बघायचं असेल तरच तुम्ही हा सिनेमा बघायची हिंमत करु शकाल.

आशिकी 2 ला रेटिंग – 30

  • suhel

    films tumchya chukichya aakshepa mule flop hot nahit saheb tumhala films madhye kalte kay te pehle saanga

close