शरद पवारांनी घेतली मंत्र्यांची झाडाझडती

April 26, 2013 4:46 PM0 commentsViews: 51

26 एप्रिल

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांची झाडाझडती घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजित पवारांसह अनेक मंत्र्यांना पवारांनी कानपिचक्या दिल्या. जाहीरसभांमधून बोलताना भान ठेवण्याची सूचनादेखील पवार यांनी केल्याची माहिती मिळाली. अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीची बैठक पार पडली.

अजित पवार यांच्या बेताल वक्तव्यानंतर पहिल्यांदाच शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक घेतली आहे. या बैठकीत आपल्या खात्याची कामगिरी सुधारून पक्षाची प्रतिमा उजळण्याचे आदेश त्यांनी मंत्र्यांना दिले. याशिवाय, वेळप्रसंगी लवकर लोकसभेची निवडणूक लढण्याची तयारी ठेवण्याचे आदेश पवार यांनी मंत्र्यांना दिले असल्याचं माहिती मिळाली. या बैठकीला केंद्रीय अवजड उद्योग मंत्री प्रफुल्ल पटेलसुद्धा उपस्थित होते. तसंच पाण्याची तीव्र टंचाई, प्रमाणाबाहेर वाढलेलं लोडशेडिंग, महिला अत्याचाराच्या वाढत्या घटना, प्राध्यापकांचा चिघळलेला संप आणि अजित पवारांच्या वक्त्यव्याच्या निमित्तानं राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची कामगिरी चर्चेत आली. त्यामुळं सर्व मंत्र्यांचं रिपोर्ट कार्ड आज स्वत: शरद पवारांनी तपासलं. तसंच आगामी काळात पक्षात आणि मंत्रिमंडळात काही फेरबदल करून पक्षातली मरगळ झटकण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी शरद पवार उद्या वरिष्ठ नेते आणि पदाधिकार्‍यांची बैठक घेणार आहेत.

close