राष्ट्रवादीला लागले मुदतपूर्व निवडणुकांचे वेध

April 27, 2013 9:34 AM0 commentsViews: 5

27 एप्रिल

मुंबई: केंद्रातील यूपीए सरकार अस्थिर दिसत असल्यानं देशात मुदतपूर्व निवडणुकांची चर्चा जोरात सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारी करण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक सुरू आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी ही बैठक बोलावली आहे. या बैठकीत पक्षाचे वरिष्ठ नेते आणि पदाधिकारी सहभागी झालेत.

राष्ट्रवादीनं 2009 मध्ये 22 जागांवर निवडणुका लढवल्या होत्या. त्यापैकी त्यांना आठच जागा जिंकता आल्या होत्या. गमावलेल्या 14 मतदारसंघांची सध्याची स्थिती कशी आहे, तिथं संभाव्य उमेदवार कोण असू शकतात अशा अनेक पैलूंची चाचपणी शरद पवार आपल्या पदाधिकार्‍यांसोबत करणार आहेत. वेळप्रसंगी मंत्र्यांनीसुद्धा लोकसभा निवडणुका लढण्याची तयारी ठेवावी असं शरद पवार यांनी मंत्र्यांना बजावलं आहे. त्याशिवाय आपापल्या खात्यांची कामगिरी सुधारून पक्षाची प्रतिमा उजळण्याचे आदेशही त्यांनी मंत्र्यांना दिलेत.

शरद पवार यांनी शुक्रवारी राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांची झाडाझडती घेतली. अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर पार पडलेल्या बैठकीत पवारांनी मंत्र्याचं रिपोर्ट कार्ड तपासलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवारांसह अनेक मंत्र्याना पवारांनी कानपिचक्या दिल्या. जाहीरसभांमधून बोलताना भान ठेवण्याची सूचनादेखील पवार यांनी केल्याची माहिती मिळाली. तसंच, आपल्या खात्याची कामगिरी सुधारून पक्षाची प्रतिमा उजळण्याचे आदेश त्यांनी मंत्र्यांना दिले. याशिवाय, वेळप्रसंगी लवकर लोकसभेची निवडणूक लढण्याची तयारी ठेवण्याचे आदेश पवार यांनी मंत्र्यांना दिले असल्याचं कळतंय. शरद पवार आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी वरिष्ठ नेते आणि पदाधिकार्‍यांची बैठक होत आहे.

close