महाराष्ट्र दिनी विविध ठिकाणी आंदोलनं

May 1, 2013 2:06 PM0 commentsViews: 7

01 मे 2013

मुंबई : महाराष्ट्र दिनाचं निमित्त साधून आज महाराष्ट्रभर विविध ठिकाणी प्रतिकात्मक आंदोलनंही झाली. मुंबईत व्यापार्‍यांनी LBT विरोधात आंदोलन म्हणून बंद पुकारला. पण व्यापार्‍यांनी त्याला पाठिंबा न दिल्यानं या बंदचा फज्जा उडाला. मुंबईत एलबीटी विरोधात व्यापार्‍यांनी बंद पुकारला होता. होलसेल च्या व्यापार्‍यांनी बंद पुकारला मात्र रिटेलर्स त्यात सहभागी नसल्यानं बंदची तीव्रता जाणवली नाही. 1 एप्रिल रोजी राज्यातील प्रमुख पाच शहरात एलबीटी लागू करण्यात आली आहे. मात्र व्यापार्‍यांनी एलबीटीला कडाडून विरोध केलाय.

कोल्हपुरात कडकडीत बंद

कोल्हापूरमध्ये टोलविरोधात सर्वपक्षीय बंद पुकारला होता. या बंदला व्यापार्‍यांनी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दिवसभर शहरातली वाहतूक दुकान आणि हॉटेल्स बंद ठेवण्यात आली होती. चक्काजाम आंदोलनही करण्यात आलं. कोल्हापूरमध्ये 11 टोलनाक्यांवर गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात टोल वसुली सुरु होणार होती. मात्र, टोल विरोधी कृती समितीच्या इशार्‍यानंतर नगरविकास खात्यानं या वसुलीला स्थगिती दिली होती. आता एक वर्षानंतर राज्य सरकार कोल्हापूरच्या टोल वसुलीवरची ही स्थगिती उठवणार अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाल्यानंतर कोल्हापूरकरांनी त्याला जोरदार विरोध केलाय.

जांबुवंतराव धोटेंचं उपोषण

यवतमाळमध्ये महाराष्ट्र दिनाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. यवतमाळमध्ये शिवसेनेनं रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं रॅली काढली होती. तर दुसरीकडे या महाराष्ट्र दिनाला यवतमाळमध्ये विरोधाची किनारही होती. गेल्या अनेक वर्षांपासून वेगळ्या विदर्भाची मागणी करणारे जांबुवंतराव धोटे आजही उपोषणासाठी बसले.महाराष्ट्र दिनाला विरोध करत स्थानिक नेताजी चौकात त्यांनी उपोषण केलं.

close