शहीद सरबजीतला अखेरचा निरोप

May 3, 2013 10:57 AM0 commentsViews: 40

03 मे

पंजाब : सरबजीत सिंग यांना आज अखेरचा निरोप देण्यात आला. पंजाबमधल्या त्यांच्या मूळ गावी भिखिविंडमध्ये त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सरबजीतसाठी आयुष्यभर लढा देणारी त्यांची बहीण दलबीरनं त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.

सरबजीतना अखेरचा निरोप देण्यासाठी भिखिविंडमध्ये लाखो लोक उपस्थित होते. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल अंत्यसंस्काराला उपस्थित राहिले. त्यापूर्वी भिकिविंडमध्ये सरबजीतसाठी सामुदायिक प्रार्थना करण्यात आल्या.

त्यांचं पार्थिव काल रात्री आठ वाजता विशेष विमानानं लाहोरहून अमृतसरला पोहचलं. त्यांच्या अंत्यसंस्काराची सर्व तयारी पंजाब सरकारनं केली होती. दरम्यान, सरबजीतना हुतात्मा घोषित केल्याचा ठराव पंजाब विधानसभेनं मंजूर केला.

पंजाब सरकारने तीन दिवसांचा दुखवटाही जाहीर केलाय. सरबजीतच्या कुटुंबीयांसाठी पंजाब सरकारने 1 कोटींची मदत आणि त्यांच्या मुलीला सरकारी नोकरी देण्याची घोषणा केली आहे.

सरबजीतच्या शरीरातून हृदय आणि किडनी गायब

पंजाबमधल्या तरनतारनमध्ये सरबजीत यांच्यावर आज पोस्ट मॉर्टेम करण्यात आलं. या पोस्ट मॉर्टेमच्या अहवालानुसार सरबजीतच्या डोक्याला अतिशय गंभीर दुखापत झाली आहे. याच दुखापतीमुळे त्यांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे. पण, अंतिम अहवाल अजून आलेला नाही.

तसंच त्यांच्या डोक्यात आणि बरगड्यांना अनेक ठिकाणी फॅक्चर झालंय. शरीरावरही अनेक ठिकाणी मार लागलाय. दरम्यान, सरबजीतच्या शरीरातून हृदय आणि किडनी गायब आहे. पुढच्या फॉरेंसिक चाचण्यांसाठी पाकिस्तानच्या डॉक्टरांनी हे अवयव काढून घेतले असावे असा अंदाज पोस्ट मॉर्टेम करणार्‍या डॉक्टरांनी वर्तवला.

close