कुडनकुलम प्रकल्पाला सुप्रीम कोर्टाचा हिरवा कंदील

May 6, 2013 10:13 AM0 commentsViews: 39

06 मे

नवी दिल्ली : तामीळनाडूतल्या कुडनकुलम अणु प्रकल्पाला सुप्रीम कोर्टाने आज हिरवा कंदील दाखवला. सुप्रीम कोर्टाने अणु प्रकल्पाला सशर्त मंजुरी दिली आहे. अणू प्रकल्प जनतेच्या भल्यासाठी आणि देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वाचा आहे असा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने दिला.

अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी देत कोर्टाने प्रकल्पाला हिरवा कंदील दिला. पण सुप्रीम कोर्टाने हे स्पष्ट केलंय की सरकारने सुरक्षेबाबत अंतिम अहवाल दाखल केल्याशिवाय अणुप्रकल्प सुरू होऊ शकत नाही. तर हा अंतिम अहवाल दाखल करण्याची तारीख अजून ठरली नाही. या अगोदरही मद्रास हायकोर्टाने अणुऊर्जाला प्रकल्पाला हिरवा कंदील दिला होता.

जपानमध्ये फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्पात झालेल्या स्फोटांमुळे भारतातील अणुऊर्जा प्रकल्पांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. याचा फटका कुडनकुलम प्रकल्पालाही बसला. या प्रकल्पाच्या विरोधात स्थानिक मच्छिमारांनी तीव्र आंदोलनं केली होती. कुडनकुलम प्रकल्पामध्ये 1,000 मेगावॅट वीजनिर्मिती होणार आहे. त्यामुळे तमिळनाडूच्या विजेची तूट भरू निघू शकते. पण आण्विक तंत्रज्ञानाबद्दलची भीती, रेडिएशनचा धोका आणि आणि त्सुनामीची शक्यता यामुळे या प्रकल्पाला विरोध होतोय.

close