शाहरूखसाठी राज ठाकरेंची ‘बॅटिंग’

May 7, 2013 9:43 AM0 commentsViews: 35

07 मे

मागे जे घडलं ते घडलं पण त्या गोष्टी चुकीच्याही असतील यात वाद नाही. पण आता वर्ष उलटलं हा विषय संपलाय. उगाच शाहरूख खानला स्टेडियमवर येऊ देणार नाही असं काही करणं हा बालिशपणा आहे. तो काही दहशतवादी नाही. हा विषय मिटवावा. त्याच्यावर घातलेली बंदी अयोग्य आहे अशा शब्दात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शाहरूख खानची पाठराखण केली आहे. राज ठाकरे यांनी या अगोदर आपल्या सभेतून आयपीएल विरोधात भूमिका मांडली होती. आणि आज अचानक राज यांनी शाहरूखची बाजू घेत ‘झालं गेलं विसरून जा’ असा सल्ला दिलाय.

आज वानखेडे स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स दरम्यान मॅच होतं आहे. मागिल वर्षी शाहरूखने वानखेडेवर सुरक्षारक्षकाशी वाद घातल्यामुळे त्यांच्यावर 5 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. मात्र आपल्या कृत्यावर शाहरूखने पत्रकार परिषद घेऊन झालेल्या प्रकरणावर माफी मागितली होती. काँग्रेसचे दिवगंत नेते विलासराव देशमुख यांनी शाहरूखवरील बंदी मागे घेतली जाईल असे संकेत दिले होते. पण यावर कोणताही निर्णय झाला नव्हता. आज पुन्हा एकदा मुंबई आणि कोलकाता वानखेडे स्टेडियमवर आमने-सामने येत आहे आणि या मॅचसाठी शाहरूखला वानखेडेवर येऊ देऊ नसे असं पत्रच एमसीएने मरिन ड्राइव्ह पोलिसांना दिलं आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळला.

शाहरूखला वानखेडेवर प्रवेश द्या, काँग्रेसने केली MCAकडे मागणी

शाहरूख खानवर घातलेल्या बंदीचा पुनर्विचार करावा व त्याला आजच्या वानखेडेवर होणार्‍या सामन्यासाठी प्रवेश द्यावा अशी विनंती सचिन सावंत यांनी प्रदेश काँग्रेसच्या वतीने एमसीएला केलीय. शाहरुखला वानखेडेमध्ये प्रवेश करताना अडवणार नाही, असं मुंबई पोलिसांनी सांगितलं. त्याचवेळी शाहरूख खानला स्टेडियममध्ये प्रवेश द्यायचा की नाही हा एमसीए चा अंतर्गत मामला असल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलंय. दरम्यान, आजची मुंबईविरुद्धची मॅच महत्त्वाची आहे, त्यामुळे कोणताही वाद वाढवण्याची शाहरूखची इच्छा नाही. त्यामुळे शाहरूख आजच्या मॅचला उपस्थित राहणार नाही असं सांगण्यात आलंय.

‘दुकानं बंद ठेवून जनतेला वेठीस धरू नका’

एलबीटीच्या मुद्द्यावरून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी व्यापार्‍यांना चांगलंच फटकारलं आहे. एलबीटी संदर्भात व्यापार्‍यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. त्यावेळी राजनी व्यापार्‍यांना खडसावलं. तुमचा लढा सरकारशी आहे. दुकानं बंद ठेवून व्यापार्‍यांनी जनतेला वेठीस धरू नका असं राज यांनी व्यापार्‍यांना सांगितलं. तुमच्या मागण्या ज्या काही आहे त्याबद्दल सविस्तर माहिती द्यावी. जर ती गोष्ट महाराष्ट्राच्या हिताची असेल तर त्याला माझा पाठिंबा असेल असंही राज ठाकरेंनी स्पष्ट केलं.

close