पंतप्रधान आणि काँग्रेसमध्ये भ्रष्ट मंत्र्यांवरून मतभेद

May 7, 2013 10:52 AM0 commentsViews: 18

07 मे

नवी दिल्ली : भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यामध्ये मतभेद असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पी. के. बन्सल आणि अश्वनीकुमार यांच्या राजीनाम्यावरून हे मतभेद झाल्याचं कळतं. बन्सल आणि अश्वनीकुमार पंतप्रधानांचे निकटवर्तीय समजले जातात.

दोन्ही मंत्र्यांच्या राजीनाम्याला पंतप्रधानांनी विरोध केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काँग्रेस कोअर कमिटीच्या बैठकीत पक्षाच्या एका गटाने दोन्ही मंत्र्यांच्या राजीनाम्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावेळी पंतप्रधानांनी दोन्ही मंत्र्यांचं समर्थन केल्याचं समजतं. रेल्वेतल्या लाचखोरीचे प्रकारण उघड झाल्यानंतर बन्सल यांनी राजीनामा द्यायला हवा होता.

तसंच अश्वनीकुमार यांनीही सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर राजीनामा द्यायला हवा होता असं मत या गटानं व्यक्त केलं. मात्र त्यांनी राजीनामा दिल्यास, विरोधक आपल्याला लक्ष्य करतील अशी भीती पंतप्रधानांनी व्यक्त केल्याचं सूत्रांनी सांगितलं. पक्षाच्या प्रतिमेलाही धक्का बसत असल्याचा काँग्रेसमधल्या एका गटाचा आक्षेप आहे.

सध्या बन्सल आणि अश्वनीकुमार यांचे समर्थन न करण्याचे पक्षाचे आदेश, देण्यात आले आहेत. दोन्ही मंत्र्यांनी आपणहून राजीनामा द्यावा यासाठी पक्षाचे प्रयत्न सुरू असल्याचं कळतं.

close