मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर

January 6, 2009 5:38 AM0 commentsViews: 13

6 जानेवारी, मुंबईमराठा समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिलंय, तर भाजपनंही त्याला पाठिंबा दिलाय. मात्र निवडणुकांपूर्वी आरक्षण लागू करा नाहीतर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडनं दिला आहे. एकंदरीतच येत्या निवडणुकांमध्ये आरक्षणाचा मुद्दा महत्वाचा ठरणार आहे.पंढरपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी लगेचच मराठा समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं. तर भाजपनंही मतांचं समीकरण ध्यानात घेत आपला पाठिंबा जाहीर करून टाकला. तर शिवसेनेनंही आपली भूमिका ठरवण्यासाठी वेळ घेतला आहे.राज्यकर्त्यांची आणि विरोधकांची ही परिस्थिती ओळखून संभाजी ब्रिगेडनं आता दबावतंत्राचा वापर सुरू केला आहे. प्रत्येक जिल्ह्यात आत्मघातकी पथकं तयार केल्याचा दावा त्यांनी केला आहे.निवडणुकांपूर्वी आरक्षण पदरात पाडून घेण्याचा संभाजी ब्रिगेडचा प्रयत्न आहे. मराठा समाजाच्या व्होटबँकेचा विचार करता सरकार आणि विरोधकांनाही हा प्रश्न सांभाळूनच सोडवावा लागणार आहे. मात्र आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी आक्रमक आंदोलनं हाच पर्याय आहे का असा सवालही आता विचारला जाऊ लागला आहे.

close