मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता

January 6, 2009 5:44 AM0 commentsViews: 5

6 जानेवारी, दिल्लीएकीकडे नारायण राणे आज दिल्लीत सोनिया गांधींची भेट घेणार आहेत, तर राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची शक्यता असल्यानं महाराष्ट्र काँग्रेसचे चार आमदार दिल्लीत तळ ठोकून बसले आहेत. विलासराव देशमुख यांचे निकटवर्तीय समजले जाणारे बाळासाहेब शिवरकर मंत्रीपद मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांनी एआयसीसीचे सदस्य गोपाल तिवारी यांच्यासोबत अ‍ॅन्टोनी यांची काल भेट घेतली. गोपालदास अग्रवाल यांनी विदर्भाला मंत्रिमंडळात योग्य ते प्रतिनिधीत्व मिळालं नसल्याचं सांगत मंत्रीपदाची मागणी केली आहे. त्याचबरोबर जयंतराव ससाणे आणि नसीम खानही दिल्लीत हजर आहेत.मात्र राणेंच्या पक्षश्रेष्ठींसोबत होणार्‍या भेटीसंदर्भात हे चौघंही आमदार चिंतीत आहेत. कारण राणे काँग्रेसमध्येच राहिले तर त्यांच्या समर्थकांनाही मंत्रीपदं मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान केंद्रीय गृहमंत्र्यांनी आज बोलावलेल्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित रहाण्यासाठी मुख्यमंत्री अशोक चव्हाण दिल्लीत दाखल झाले आहेत. तर गृहमंत्री जयंत पाटीलही सकाळी दिल्लीत दाखल होणार आहेत. दरम्यान प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे आज दिल्लीत येत आहेत. मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि ठाकरे अ‍ॅन्टोनी आणि सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांच्याशी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा करण्याची शक्यता आहे.

close