अंधश्रद्धेमुळे अख्ख गावं दुष्काळाच्या खाईत !

May 13, 2013 5:30 PM0 commentsViews: 20

विनोद तळेकर, मुंबई

सातारा 13 मे : सध्या महाराष्ट्रातल्या 15 जिल्ह्यात दुष्काळ आहे…पाण्याची टंचाई सर्वत्रच आहे, त्याची कारणं अनेक आहेत. पण अंधश्रध्देमुळे एखाद्या गावात पाणीटंचाई आहे. असं जर सांगितलं तर खरं वाटणार नाही. पण, सांगलीतल्या आटपाडीजवळच्या माडगुळ गावात अंधश्रद्धेमुळे पाणीटंचाईची समस्या भेडसावतेय.

आटपाडीपासून तीस किलोमीटरवर असलेलं…माडगुळे हे गाव… या गावची एक वेगळी ओळख सांगायची तर ग.दि.माडगुळकर आणि व्यंकटेश माडगुळकरांचं हे गाव. बारमाही पाणी असणार्‍या तळ्याकाठी हे गाव वसलंय. पण गावच्या खंडोबाचे वाघे असलेल्या वाघमारेंना एके दिवशी खंडोबाने दुष्टांत दिला, की या तळ्याशेजारी मी गाव वसू देणार नाही…गाव इथून हालवा…

गावकर्‍यांच्या या निर्णयामुळे गाव साधारण दोन किमी पुढे आणलं गेलं. त्यामुळे तलाव मागे पडला. त्याच्याकडे दुर्लक्ष झालं. तलावाचा वापर बंद झाल्याने तो बराचसा बुजला गेला..आणि जो काही थोडा थोडका उरला तोही प्रदूषित झाला. आता त्याचं पाणी ना पिण्यासाठी वापरलं जात ना शेतीसाठी…गावात आता टँकरने पाणीपुरवठा होतो.

पुरातन काळापासून पाण्याच्या आसपास मानवी वस्ती बहरली. माडगुळेच्या गावकर्‍यांना नेमका याचाच विसर पडल्याने त्यांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. गावातल्या महिलांना पाण्यासाठी मैलोन मैल पायपीट करावी लागते. श्रद्धेची सीमा ओलांडून जेव्हा मानवाच्या भावना अंधश्रद्धेत रुपांतरीत होतात तेव्हा मानवाला त्याची किंमत चुकवावीच लागते.

close