पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कारवाईचा देखावा

January 7, 2009 4:45 AM0 commentsViews: 3

7 जानेवरी पिंपरी चिंचवडपिंपरी चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुरदास गायकवाड यांनी एक अनधिकृत इमारत बांधली होती. महापालिकेच्या शाळेसाठीच्या राखीव जागेवर नगरसेवक सुरदास गायकवाड यांनी ही अनधिकृत इमारत बांधली होती. पण ती इमारत पाडण्याचा आदेश हायकोर्टानं दिल्यामुळे महापालिकेची चांगलीच धावपळ झाली. शाळेसाठीचा आरक्षित 10 गुंठयांचा भूखंड गायकवाड यांनी हडप केल्याचं स्पष्ट झाल्यामुळे हायकोर्टाने इमारत पाडण्याचे आदेश दिले. कारवाई करण्यासाठी पालिकेचे अधिकारी सगळा फौजफाटा घेऊन इमारत पाडण्यासाठी घटनास्थळी पोहचले. पण त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. पालिकेचे अधिकारी केवळ स्टे ऑर्डरची वाट पहात असल्याचं चित्र दिसलं. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानंही आपल्या नगरसेवकाला पाठीशी घालण्याची भूमिका घेतली आहे असंच बोललं जातं. त्यामुळे पिंपरी चिंचवडचे राष्ट्रवादीचे नगरसेवक सुरदास गायकवाड यांचे अनाधिकृत बांधकाम तोडण्याची पालिकेची कारवाई फार्स ठरली. सुप्रीम कोर्टातनं तात्पुरता स्टे मिळाल्यानं आजचं मरण उद्यावर गेल्यानं सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला आहे.

close