सट्‌ट्यासाठी भावाने केली भावाची हत्या

May 15, 2013 3:56 PM0 commentsViews: 23

मुंबई 15 मे : अल्पवयीन मुलाच्या क्रूर हत्येनं आज मुंबई हादरली. आयपीएल मॅचवर लावलेल्या सट्‌ट्यात हरलेले पैसे परत मिळवण्याच्या नादात चुलत भावानंच आपल्या 13 वर्षांच्या भावाचं अपहरण केलं. आणि नंतर त्याची हत्या केली. पोलिसांनी याप्रकरणातल्या दोन्ही आरोपींना अटक केलीय.

13 वर्षांच्या आदित्य रांकाच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरलीय. 13 मे रोजी त्याचं अपहरण झालं आणि दोन दिवसांनंतर पोलिसांना त्याचा मृतदेह सापडला. पण, याहून धक्कादायक गोष्ट म्हणजे आदित्यचा चुलत भाऊ आणि मित्रानंच त्याची हत्या केली.

- पोलीस म्हणतात आदित्यचा चुलत भाऊ हिमांशू आणि त्याचा मित्र विजेश यांनी आयपीएल मॅचवर सट्टा लावला आणि 10 लाख रुपये हरले – त्यामुळे त्यांनी आदित्यचं अपहरण करून 30 लाख रुपयांची खंडणी मागण्याचा कट रचला – 13 मे रोजी त्याचं अपहरण करून विजेश त्याला रायगडला घेऊन गेला आणि हिमांशू त्याच्या वडिलांना घेऊन पोलिसांत तक्रार नोंदवायला गेला – पण, पोलिसांना हिमांशुवर संशय आल्यानं दोघंही घाबरले- घाबरलेल्या विजेशनं आदित्यच्या मनगटावर आणि गळ्यावर चाकूचे वार केले आणि त्याला नवी मुंबईतल्या एका निर्जन रस्त्यावर फेकून दिलं. ज्या कारमधून आदित्य रांका याचा मृतदेह नेऊन त्याची विल्हेवाट लावण्यात आली. त्याच कारमधून आरोपींनी आदित्य रांका याच्या वडिलांना घरी सोडलं. यावरूनच हे आरोपी किती सराईत होते हे स्पष्ट होतं.

दोघंही आरोपी एमबीए झालेत आणि स्वत:चा व्यवसाय करतात. 2006 मध्येही अशाच प्रकारे 17 वर्षांच्या अदनान पत्रावालाची त्याच्या मित्रांनी अपहरण करून हत्या केली होती. 7 वर्षांनंतर तशाच प्रकारच्या गुन्ह्यानं मुंबई हादरली.

close