278 कोटी बुडवून मुन्नाभाई चले जेल !

May 16, 2013 3:31 PM0 commentsViews: 58

नीलिमा कुलकर्णी, मुंबई

16 मे

1993 बॉम्बस्फोट प्रकरणी अभिनेता संजय दत्त आज जेलमध्ये गेल्यानंतर बॉलीवुडचं मोठं नुकसान होणार आहे. आज संजय दत्तवर निर्मात्यांनी तब्बल 278 कोटी रुपये लावले आहेत. म्हणूनच त्याच्या मुदतवाढीसाठी निर्मात्यांनीही कोर्टात याचिका दाखल केली होती. आता त्याच्या सिनेमांचं भविष्य टांगणीवर आहे.

बॉलिवूडचा खलनायक संजू बाबा.. वास्तवातही त्याच मार्गाने चाललाय. 1993 सालच्या बॉम्बस्फोट प्रकरणी कोर्टाने त्याची पुन्हा एकदा तुरुंगात रवानगी केली. त्याच्या शिक्षेची सुनावणीनंतरच त्याच्या शूट होत असलेल्या सिनेमांचं भवितव्य संकटात सापडलं. चार महिन्यांची मुदतवाढ मिळाल्यानंतर संजूबाबाने काही सिनेमांचं शूटिंग पूर्ण केलं.

शूटिंग पूर्णपोलिसगिरी, पी.के आणि अलिबाग या सिनेमांचं शूटिंग संजय दत्तने पूर्ण केलं.

शूटिंग अपूर्णजंजीर, उंगली, तक्रार आणि वसूली या सिनेमांचं शूटिंग मात्र अजूनही अपूर्ण आहे. करण जोहर निर्मित उंगली हा सिनेमा संजूबाबासाठी महत्वाचा होता, पण त्याचं शूटिंग संजय पूर्ण करू शकला नाही.

भूमिका वगळली'घनचक्कर' या सिनेमातही संजय दत्तची लहानशी भूमिका असणार होती पण शिक्षेच्या सुनावणीनंतर निर्मात्यांनी यातून संजयला वगळण्यात आले.

संजयला सुनावलेल्या शिक्षेमुळे निर्मात्यांचे जवळपास 278 कोटी रुपये पणाला लागले आहेत. यापूर्वी जेव्हा संजय दत्त तुरुंगात गेला, तेव्हा त्याच्या करिअरला फटका बसला होता. पण आधी वास्तव.. आणि नंतर मुन्नाभाईच्या रूपाने त्याने प्रेक्षकांचं प्रेम परत मिळवलं. म्हणूनच त्याने लवकरात लवकर जेलमधून सुटावं अशी इच्छा बॉलिवूडमधल्या अनेकांनी व्यक्त केली. संजय दत्तचा पोलिसगिरी हा सिनेमा प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर आहे. 5 जुलैला पोलिगिरी प्रदर्शित होईल. शरण आल्यानंतर प्रदर्शित होणारा संजय दत्तचा हा पहिलाच सिनेमा असेल.

close