असं झालं स्पॉट फिक्सिंग, पोलिसांचा पुराव्यानिशी खुलासा

May 17, 2013 2:04 PM0 commentsViews: 14

नवी दिल्ली 16 मे :क्रिकेट आणि मनोरंजन असं कॉम्बिनेशन असलेल्या आयपीएलला आज एक मोठा धक्का बसला. स्पॉट फिक्सिंगप्रकरणी श्रीसंत, अंकित चव्हाण आणि अजित चंडिला या राजस्थान रॉयल्सच्या तीन खेळाडूंना दिल्ली पोलिसांनी अटक केली. त्यामुळे क्रिकेटविश्वात खळबळ उडाली. बीसीसीआयने या तिन्ही खेळाडूंना निलंबित केलंय. पण, या वादामुळे आयपीएल 6 रद्द करणार नाही, असंही बीसीसीआयनं स्पष्ट केलंय. त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळालीय. आयपीएलमधलं हे स्पॉट फिक्सिंग नेमकं कसं झालं, याचं पुराव्यासहीत वर्णन दिल्ली पोलिसांनी पत्रकार परिषदेत केलं.

Image ipl_spoat_fixing_300x255.jpg

एका मोठ्या वादळामुळे भारतीय क्रिकेटविश्व हादरलंय. अंकीत चव्हाण, अजित चंडिला आणि 2007च्या टी-20 वर्ल्ड कपच्या हिरोंपैकी एक असलेला श्रीसंत या तिघांवर आयपीएल मॅच फिक्सिंगचे आरोप झालेत. राजस्थान रॉयल्सच्या या तीन बॉलर्सना दिल्ली पोलिसांनी मुंबईत अटक केली. याशिवाय या तिघांच्या संपर्कात असल्याचा आरोप असलेल्या 11 बुकींनाही अटक झाली आहे.
एका वेगळ्या प्रकरणात फोन टॅपिंग करताना या तीन खेळाडूंचे बुकींसोबतचे संवाद टॅप झाल्याचं पोलिसांनी सांगितलंय. त्यानंतर पोलिसांनी गेला आठवडाभर शेकडों तासांचे फोनकॉल्स टॅप केले आणि त्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली.
बुकी आणि हे खेळाडू सतत संपर्कात होते. 5 मे रोजी राजस्थान रॉयल्सची पुणे वॉरियर्सबरोबर मॅच होती. या मॅचमध्ये अजित चंडिलानं स्पेलच्या दुसर्‍या ओव्हर 14 किंवा त्यापेक्षा जास्त रन देणार हे ठरलं होतं. ही ओव्हर टाकण्यापूर्वी बुकीजना संकेत म्हणून अजित शर्ट वर करणार असं ठरलं. पण, ओव्हर टाकण्यापूर्वी अजित संकेत द्यायला विसरला. तरी त्याने ओव्हरमध्ये 14 पेक्षा जास्त रन्स दिले. पण, अजित संकेत द्यायला विसरल्यानं बुकीजनं त्याला आगाऊ दिलेले 20 लाख रुपये परत मागितले.
यानंतरचं स्पॉट फिक्सिंग झालं ते 9 मे रोजी झालेल्या पंजाबविरुद्धच्या मॅचमध्ये..या सामन्यात श्रीसंत एका ओव्हरमध्ये 14 पेक्षा जास्त रन्स देणार होता, असं पोलिसांनी सांगितलंय. या ओव्हरपूर्वी बुकींना संकेत म्हणून तो एक टॉवेल आपल्या पँटला लावणार होता आणि अशीच ओव्हर श्रीसंतनं टाकलीसुद्धा…
15 मे रोजी मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये अंकित चव्हाणने स्पॉट फिक्सिंग केल्याचा खुलासा पोलिसांनी केला. अंकितने त्याच्या स्पेलच्या दुसर्‍या ओव्हरमध्ये 14 पेक्षा जास्त रन्स देण्याचं कबूल केलं होतं. आणि त्यासाठी त्याला 60 लाख रुपये दिले गेले. पण हे डील अंकित चव्हाणनं केलं नव्हतं तर अजित चंडिलानं अंकितला भुरळ घालत स्पॉट फिक्सिंग करायला भाग पाडल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
या स्पॉट फिक्सिंगमध्ये इतर खेळाडूंचा हात नाही. पण आणखी काही बुकीजना अटक होऊ शकते असं पोलिसांनी सांगितलंय. अंडरवर्ल्ड आणि दिल्ली, मुंबई, अहमदाबादमधल्या बड्या बुकींचा या हात असल्याचा दाट संशय आहे.
अजित चंडिलाची फिक्सिंग
5 मे रोजी जयपूरमध्ये पुणे वॉरिअर्सविरुद्ध झालेल्या मॅचमध्ये अजित चंडिलानं पहिल्यांदा स्पॉट फिक्सिंग केल्याचा खुलासा दिल्ली पोलिसांनी केला. चांदिलियाच्या स्पेलमध्ये दुसर्‍या ओव्हरमध्ये अजित 20 रन्स देणार हे ठरलं होतं आणि त्यासाठी किंमत 20 लाख पक्की झाली होती. पण या मॅचमध्ये अजित चांदिलियानं ठरलेली खूण ओव्हरअगोदर बूकीजना दिली नाही त्यामुळे या मॅचचे पैसे अजित चांदिलियाकडून बूकीजनं परत मागितले होते.

– 5 मे 2013, जयपूर
– राजस्थान रॉयल्स विरुद्ध पुणे वॉरियर्स
– दुसर्‍या ओव्हरला 14 पेक्षा जास्त रन्स देण्यासाठी 20 लाख रुपये
– बूकीजना खूण दिली नाही, त्यामुळे बूकीजनं पैसे मागितले परत


श्रीसंतची फिक्सिंग

9 मे रोजी मोहालीमध्ये पंजाब किंग्ज इलेव्हन विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये श्रीसंतनं स्पॉट फिक्सिंग केल्याचा खुलासा पोलिसांनी केला. श्रीसंतनं त्याच्या स्पेलच्या दुसर्‍या ओव्हरमध्ये 14 पेक्षा जास्त रन्स देण्याचं मान्य केलं होतं. त्यासाठी त्यानं आपण टॉवेल आपल्या पँटला लावू ही खूण ठरवली होती.
– 9 मे 2013, मोहाली
– राजस्थान रॉयल्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब
– पँटमध्ये टॉवेल लावण्याची ठरली होती खूण


अंकित चव्हाणची फिक्सिंग

तर 15 मे रोजी मुंबईमध्ये मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये अंकित चव्हाणने स्पॉट फिक्सिंग केल्याचा खुलासा पोलिसांनी केला. अंकितनं त्याच्या स्पेलच्या दुसर्‍या ओव्हरमध्ये 14 पेक्षा जास्त रन्स देण्याचं कबूल केलं होतं. आणि त्यासाठी त्याला 60 लाख रुपये दिले गेले. पण हे डील अंकित चव्हाणनं केलं नव्हतं तर अजित चांदिलियानं अंकित चव्हाणला भुरळ घालत स्पॉट फिक्सिंग करायला भाग पाडलं होतं.
– 15 मे 2013, मुंबई
– राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
– दुसर्‍या ओव्हरला 14 पेक्षा जास्त रन्स देण्यासाठी 60 लाख रुपये
– अजित चंडिलानं अंकित चव्हाणला स्पॉट फिक्सिंगसाठी केलं तयार

 

अंकित चव्हाणचं करिअर

– वय: 27 वर्ष
– IPLमध्ये ‘राजस्थान रॉयल्स’ टीमचं प्रतिनिधित्व
– याआधी ‘मुंबई इंडियन्स’ टीमचंही प्रतिनिधित्व केलंय.
– ऑलराईंडर, डावखुरा बॅट्समन
– फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये ‘मुंबई टीम’चं प्रतिनिधित्व


अजित चंडिलाचं करिअर

– वय: 29 वर्ष
– IPLमध्ये ‘राजस्थान रॉयल्स’ टीमचं प्रतिनिधित्व
– ऑलराऊंडर, ऑफ ब्रेक बॉलर
– याआधी ‘दिल्ली डेअरडेव्हिल्स’ टीमचंही केलं प्रतिनिधित्व
– फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये हरयाणा टीमचं प्रतिनिधित्व
– 2012: IPLमध्ये ‘पुणे वॉरियर्स’विरूध्द घेतली होती हॅट्‌ट्रिक

राजस्थान रॉयल्स टीमच्या व्यवस्थापनानं एक निवेदन प्रसिद्ध केलंय
आम्ही आश्चर्यचकित झालो आहोत. आमच्या तीन खेळाडूंना मॅचेसमधील स्पॉट फिक्सिंगसंबंधी चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे, असं आम्हाला सांगण्यात आलं आहे. सध्या आमच्याकडे सगळी माहिती नाही आणि आम्ही काहीही सांगू शकत नाही. या प्रकरणी आम्ही बीसीसीआयच्या संपर्कात आहोत. याची सखोल चौकशी व्हावी यासाठी आम्ही पूर्ण सहकार्य करू. राजस्थान रॉयल्सचं व्यवस्थापन खेळात खिलाडू वृत्तीच्या विरोधात जाणारी कोणतीही बाब खपवून घेणार नाही.

close