भले शाब्बास..लोकसहभागातून उभारला तलाव !

May 17, 2013 1:11 PM0 commentsViews: 56

विनोद तळेकर, सातारा

सातारा 17 मे : सध्या महाराष्ट्रात दुष्काळावर मात करण्यासाठी सरकारी यंत्रणा कामाला लागलीय. अनेक ठिकाणी लोक सहभागातूनही कामं केली जात आहेत. पण सरकारी यंत्रणा आणि लोकसहभाग यांचे एकत्रित प्रयत्न झाले तर काय होऊ शकतं यांचं एक उत्तम उदाहरण म्हणजे सातार्‍याच्या गोडोली तलावाचा झालेला कायापालट…

सातारा शहरात प्रवेश करताच लक्ष वेधून घेतो तो हा स्वच्छ आणि सुंदर असा गोडोली तलाव….पण हा तलाव फक्त सहा महिन्यांपुर्वी असा होता. झाडीझुडपांनी वेढलेला एक उकीरडा…त्याचा कायापालट करण्यात पुढाकार घेतला तो सातार्‍यातले प्रसिद्ध डेंटीस्ट डॉ. अविनाश पोळ यांनी…

1859 साली बांधलेल्या या ऐतिहासिक तलावातून 1954 सालापर्यंत शहरातल्या सदर बाजार कँप या भागाला पाणी पुरवठा होत होता. कालांतराने हा तलाव गाळाने भरला आणि कचर्‍याने भरून गेला होता. डॉ. पोळ आणि त्यांच्या सहकार्‍यांनी कामाला सुरूवात केल्यानंतर हळूहळू लोकांचा सहभागही वाढू लागला.

लोकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहून मग स्थानिक लोकप्रतिनिधींनीही आपला विकासनिधी या प्रकल्पासाठी वळवला. आता या तलावाशेजारच्या नाल्यातून वाहणारं सांडपाणी शुद्धीकरणाचा प्रकल्पही राबवण्यात येतोय. त्याचबरोबर या तलावामुळे भुजल पातळी वाढल्यामुळे आसपासच्या विहिरींना त्याचा फायदा होईल. एकूणच काय तर लोकसहभाग आणि सरकारी मदत यातून एक चांगला प्रकल्प आकाराला आला एवढं नक्की…

close