अक्षय्यतृतीयेच्या निमित्तानं व्यापार्‍यांचा कुठे बंद कुठे माघार

May 13, 2013 10:51 AM0 commentsViews: 47

पुणे 13 मे : एलबीटीविरोधात व्यापार्‍यांनी पुकारलेला बंद आज काही ठिकाणी मावळला. अक्षय्यतृतीयाच्या मुहूर्तावर व्यापार्‍यांनी दुकानं उघडली त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. आजच्या दिवशी घेतलेली वस्तू अक्षय्य राहते अर्थात तिचा क्षय होत नाही, असा समज आहे. त्यामुळेच आज सोने-चांदीची आवर्जून खरेदी केली जाते. सोन्याचे भाव उतरल्यानं आजचा मुहूर्त साधण्यासाठी राज्यभरातल्या दुकानांत गर्दी होतेय.

मुंबई, ठाणे, जळगाव, नागपूरमध्ये सराफा दुकानं उघडली. मात्र एलबीटीमुळे पुण्यात सराफा दुकानं बंद आहेत. त्यामुळेच ग्राहकांची निराशा होतेय. आज पुण्यात दुकान उघडणार्‍याकडून त्यांची संघटना 20 हजारांचा दंड वसूल करणार आहे. नागपुरात सराफ बाजार सुरू

तर नागपुरात गेल्या 20 दिवसांपासून एलबीटीविरोधी आंदोलनामुळे बंद असलेला नागपूरच्या सराफा बाजार आज सुरु झाला. साडेतीन मुहर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर नागपुरातली सराफा दुकानं गदीर्ंनी फुललीत. मागील महिन्यात सोन्याच्या भावात मोठी घसरणं झाली. आज सोन्याचा दर 27 हजार 700 रुपये आहे. त्यामुळे आजच्या दिवशी सोन्याची लूट करण्यात ग्राहकराजा मग्न झालाय.

ठाण्यात व्यापार्‍यांनी उघडली दुकानं

अक्षय्यतृतीयेसाठी ठाण्यामध्ये व्यापार्‍यांनी आज दुकानं उघडली आहेत. आजच्या मुहूर्तावर खरेदीसाठी ग्राहकांनी बाजारपेठेत लोकांनी गर्दी केली. LBT च्या विरोधामुळे ठाण्यात गेले काही दिवस दुकानं बंद होती. पण अक्षय्यतृतीयेसाठी म्हणून आज दुकानं उघडण्यात आली. त्यातच लग्नसराई असल्यामुळे आजचा मुहूर्त साधण्यासाठी विशेष गर्दी झाली.

कोल्हापुरात कडकडीत बंद

कोल्हापुरातही सराफ व्यावसायिकांनी एलबीटीविरोधात कडकडीत बंद पुकारलाय. त्यामुळे कोल्हापूर शहरातील 100 कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झालीय. एलबीटी विरोधात शहरातल्या 45 व्यापारी संघटनांनी गेले 3 दिवस बेमुदत बंद पुकारलाय. त्याला सराफ व्यावसायिकांनी पाठिंबा देत आजही बंद कायम ठेवलाय. व्यापार्‍यांनी सरकारवर टीका करत एलबीटीबीबत लवकर निर्णय घेतला नाही तर बंद व्यापक करण्याचा इशारा दिला.

close