राजस्थानचे आणखी दोन खेळाडू पोलिसांच्या रडारवर ?

May 17, 2013 4:22 PM0 commentsViews: 32

नवी दिल्ली 15 मे : आयपीएलच्या स्पॉट फिक्सिंगने संपूर्ण क्रिकेट जगत हादरलंय. गेल्या 24 तासांमध्ये झालेल्या तपासात अनेक धक्कादाबक बाबी पुढे आल्या आहेत. राजस्थान रॉयल्सचे आणखी दोन खेळाडू पोलिसांच्या रडारवर आहेत. यात एक भारतीय तर दुसरा परदेशी बॅट्समन आहे. आणखीही काही खेळाडूंना अटक होऊ शकते अशी माहिती मुंबई पोलिसांचे गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त हिमांशु रॉय यांनी दिली.

दरम्यान, श्रीसंतनं चौकशीदरम्यान स्पॉट फिक्सिंग केल्याची कबुली दिल्याची माहिती दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिली. श्रीसंतनं काल पोलिसांना चौकशीदरम्यान अजिबात सहकार्य केलं नाही. आज तो काहीसा मवाळ झाला. पण, आपण निर्दोष असल्याचं त्याचं म्हणणं होतं. पण, त्यानंतर त्यानं गुन्हा कबूल केल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळतेय. एक, दोन नव्हे तर तब्बल 15 मॅचमध्ये फिक्सिंग झाल्याचा पोलिसांना संशय आहे. तपासाच्या दृष्टीनं राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन राहुल द्रविड आणि टीमच्या मालकांची चौकशी होण्याची शक्यता आहे.

स्पॉट फिक्सिंगप्रकरणी तीन खेळाडूंना अटक होऊन चोवीस तासही उलटत नाहीत. तोच त्यांच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे बाहेर येत आहेत. आयपीएलमधल्या खेळाडूंना पैशांसोबतच दारू आणि मुलींचं प्रलोभन दाखवल्याचं खेळाडूंच्या चौकशीतून समोर येतंय. मुंबईच्या अंकित चव्हाणनं सुरुवातीलाच आपला गुन्हा कबूल केलाय, असं दिल्ली पोलिसांमधल्या सूत्रांनी सांगितलं. चौकशीदरम्यान त्याला कोठडीत रडू सुध्दा कोसळलं. अंकितचे वडील सध्या दिल्लीमध्ये पोहोचले आहेत.

गेल्या वर्षीपर्यंत राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा अमित सिंग हाच बुकी म्हणून काम करत असल्याचंही समोर आलंय. त्याला यापूर्वीच निलंबित करण्यात आलं असून चौकशी सुरू आहे. यामध्ये आणखी 10 सट्टेबाजांवर पोलीस लक्ष ठेवून आहेत. याआधीच्या मॅचमध्येही अजित चंडिलानं फिक्सिंग केल्याचा संशय आहे.

पोलिसांनी महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान या पश्चिम पट्‌ट्यावर लक्ष केंदि्रत केलंय. तसेच मुंबईसह अनेक शहरामध्ये पोलिसांनी सट्टेबाजांवर छापे टाकायला सुरूवात केली आहे. यामध्ये आणखीही राजस्थान रॉयल्सचे दोन खेळाडूंशी संपर्क साधण्यात आला होता अशी माहिती अंकित चव्हाणनं कबुलीजबाबात दिली आहे. यापैकी एकजण भारतीय तर एकजण परदेशी खेळाडू आहे.

धक्कादायक खुलासे- अमित सिंग बुकी म्हणून कार्यरत असल्याचा संशय- अमित सिंग राजस्थान रॉयल्सचा माजी खेळाडू- 10 सट्टेबाजांवर विशेष लक्ष – महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान या राज्यांवर लक्ष केंदि्रत – मुंबईसह अनेक शहरांमध्ये सट्टेबाजांवर छापे टाकायला सुरुवात – राजस्थान रॉयल्सचे आणखी दोन खेळाडूही फिक्सर?

अजित चंडिलाने सांगितल्याप्रमाणे खूण केली नाही, म्हणून बुकीने त्याच्याकडून 20 लाख रूपये परत मागितले होते. त्यावरून या दोघांमध्ये वादविवादही झाले होते. त्याहीपेक्षा धक्कादायक म्हणजे चंडिलानं बुकींना आणखीही काही खेळाडूंना यामध्ये आणणार असल्याचे आश्वासन दिल्याचंही या कॉल्समधून समोर आलंय. याप्रकरणी बीसीसीआय तीन खेळाडूंसह एका बुकीवर फौजदारी कारवाई करण्याची शक्यता आहे. याबद्दल बीसीसीआयच्या रविवारच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे.

असं झालं स्पॉट फिक्सिंग !

close