एलबीटीचा तिढा सुटणार ?

May 20, 2013 9:57 AM0 commentsViews: 20

मुंबई 20 मे : दीड महिन्यापासून एलबीटीबाबत सुरू असलेला वाद आज मिटण्याची शक्यता आहे. एलबीटी संदर्भात राज्यातील व्यापारी शिष्टमंडळ आणि राज्याचे मुख्य सचिव यांच्यात महत्वपूर्ण बैठक होतेय. आज होणार्‍या बैठकीत काही सकारात्मक तोडगा निघण्याची अपेक्षा आहे. बंदवरून व्यापार्‍यांमध्ये फूट पडली आहे.

यापूर्वी झालेल्या दोन बैठकांमध्ये कोणातही तोडगा निघू शकलेला नाही. कालच राज्यातल्या व्यापर्‍यांनी बंद मागे घ्यावा यासंदर्भात केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी आवाहन केलंय. व्यापार्‍यांच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचं आश्वासन दिलंय. या सर्व घडामोडीत राज्यातील व्यापार्‍यांनी काहीशी नमती भूमिका घेतली आहे. आता राज्य सरकार देखील काही बाबतीत सकारात्मक भूमिका घेण्याची शक्यता आहे.

पुण्यात दुकानं उघडली !

दरम्यान, एलबीटीविरोधातला संप पुणे मर्चंट्स चेंबर्सने रविवारी मागे घेतला. राज्याचे मुख्य सचिव जयंत बाठिया यांच्यासोबत या शिष्टमंडळाची चर्चा झाली. त्यावेळेस काही मुद्द्यांवर एकमत झाल्यानं हा संप मागे घेण्यात येत असल्याचं अजित सेठिया यांनी सांगितलंय. त्यामुळे आजपासून दुकानं उघडण्यात येतील. मात्र योग्य निर्णय झाला नाही तर मंगळवारपासून आंदोलनाची दिशा बदलण्यात येईल, असंही सेठिया यांनी सांगितलं आहे.

व्यापार्‍यांनी बंद मागे घ्यावा -बाबा आढाव

व्यापार्‍यांनी एलबीटी विरोधात सुरू ठेवलेला बंद तत्काळ मागे घेतला पाहिजे. या मागणी करिता पुण्यात आज बाबा आढाव यांच्या अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आलं. एलबीटी बंदमुळे मंजूराच्या हाताला काम मिळत नाही आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. एलबीटी बंद थांबला पाहिजे, बाजार पेठ सुरू झाल्या पाहिजे आणि कामगारांना रोजगार मिळाला पाहिजे अशा विविध मागण्या बाबा आढाव यांच्या संघटनेच्या वतीने करण्यात आल्या. मागण्या मान्य न झाल्यास सहकुटुंब आमरण उपोषण करण्याचा इशाराही बाबा आढाव यांच्या संघटनेनं दिला आहे.

close