स्पॉट फिक्सिंग प्रकरणी विंदू दारा सिंगला अटक

May 21, 2013 10:26 AM0 commentsViews: 57

मुंबई 21 मे : आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणाला आज बॉलिवूड कनेक्शन उघड झाले आहे. दिवंगत जेष्ठ अभिनेते दारा सिंग यांचा पूत्र विंदू दारा सिंगला मुंबई क्राईम ब्रांचने सोमवारी मध्यरात्री अटक केली. विंदूने आपण बेटींगमध्ये सहभागी असल्याच मान्य केलं आहे. अटकेत असलेला बुकी रमेश व्यासने तपास अंतर्गत विंदू दारा सिंगसोबत संपर्कात होतो अशी कबुली दिली होती. व्यासच्या कबुली जबावावरून विंदूला अटक करण्यात आली.

विंदूला 24 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.विंदूसोबत कल्पेश पटेल या कुरिअर बॉय आणि प्रेम तलरेजा या व्यक्तीलाही अटक केली आहे. याबरोबरच आणखी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे पण त्याचं नाव अजून मुंबई क्राईम ब्रँचकडून सांगण्यात आलेलं नाही. विंदू सोबतच बॉलिवूडमधील अजूनही काही कलाकार स्पॉट फिक्सिंगशी संबंधित असल्याचा मुंबई क्राईम ब्रांचला संशय आहे. यासंदर्भात पोलीस विंदूची अधिक चौकशी करत आहे.

धोणीची पत्नी साक्षीसोबत विंदूचा फोटो

बॉलिवूड आणि क्रिकेटर्सदरम्यानचे संबंध हे काही नवे नाहीत. पण विंदू दारा सिंगच्या अटकेनं आयपीएलमधल्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणात बॉलिवूड कनेक्शन असल्याचंही उघड झालंय. चेन्नई सुपर किंग्जचा कॅप्टन महेंद्रसिंग धोणीची पत्नी साक्षी हिच्यासोबत चेन्नई टीमला सपोर्ट करताना विंदूला स्टेडिअममध्ये पाहिलं गेलंय. पण विंदूशी महेंद्रसिंग धोणी किंवा साक्षीचा काहीही संबंध नाही अशी माहिती धोणीच्या निकटवर्तीयांनी दिली. तसेच आयपीएलमधल्या काही क्रिकेटर्सबरोबरही विंदू सिंगचे चांगले संबंध असल्याचं समोर येतं आहे.

रणजीपटूला अटक

आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आज माजी रणजीपटू बाबूराव यादवला अटक केली आहे. सोमवारी बाबुराव यादवला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार बाबूराव यादव यानं अजित चंडिला आणि बुकी सुनील भाटीया यांची ओळख करुन दिली होती. या आरोपावरुन बाबूराव यादवला अटक करण्यात आली. बाबूराव हा माजी रणजीपटू असून तो रेल्वेकडून खेळायचा अशी माहिती मिळतेय.

#Vindoo Dara Singh

#ipl #betting #vindoo dara singh

close