अहिल्याबाईंनी उभारलेली बारव नवसंजीवनी !

May 31, 2013 1:40 PM0 commentsViews: 175

सिध्दार्थ गोदाम, जालना

अंबड 31 मे : आज अहिल्याबाई होळकर यांची जयंती…आज गावागावात दिसणारे बारव ही अहिल्याबाईची देणगी आहे. पाण्याच्या नियोजनाचं फार सुंदर उदाहरण त्यांनी बारवांच्या माध्यमातून आपल्यासमोर ठेवलंय. त्यांनी केलेल्या पाण्याच्या नियोजनाचे अनोखे दाखले इतिहासात आढळतात.

ही आहे अंबड शहरातली ही पुष्करणी बारव…कचरा टाकून बुजवलेल्या या ऐतिहासिक बारवाची साफसफाई करण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. अंबडकरांना त्याची आज खूपच गरज भासू लागली आहे. कारण या बारवात बाराही महिने पाणी असतं. 1761 पूर्वी अंबड भागात पाण्याचा मोठा दुष्काळ होता. इथल्या पाण्याच्या संकटावर मात करण्यासाठी अहिल्याबाई होळकरांनी अंबडमध्ये सहा बारवं बांधली. या बारवांना कायम स्वच्छ आणि भरपूर पाणी असतं. कायम पाणी देणार्‍या अहिल्याबाईंच्या या बारवांकडं दुर्लक्ष झालंय.

पाण्याच्या नियोजनावर अहिल्याबाईंचा विशेष भर होता. ही आहे अंबडमधीलच कावंदी बारव..ही बारव कधीच कोरडी पडली नाही. आजही या बारवामध्ये बाराही महिने स्वच्छ पाणी असतं. या कायम पाणी पुरवणार्‍या बारवांकडे अंबडकरांनी दुर्लक्ष केलंय. यामुळे पाण्याच्या भीषण टंचाईला त्यांना सामोरं जावं लागलं. राजू डोंगरे या तरुणानं मुंबई जनजागृती मंचच्या सहाय्यानं बारवं स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली.

तब्बल तीनशे वर्षांपूर्वी अहिल्याबाई होळकरांनी पाण्याचे सुंदर नियोजन करुन पाणीटंचाईवर मात केली. पण, पाण्याचा इतका मोठा खजिना आपल्या हातात असतानाही, आपण केवळ आपल्या निष्काळजीपणामुळे पाणी जवळ असूनही पाण्यासाठी वणवण फिरतोय.

close