नाशिकमध्ये 3 बुकींना अटक

May 23, 2013 2:02 PM0 commentsViews: 6

नाशिक 23 मे : आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी औरंगाबादमध्ये बुकींना अटक केल्यानंतर आता नाशिकमधूनही आयपीएलवर बेटिंग करणार्‍या 3 बुकींना पोलिसांनी अटक केली. हैदराबाद सनरायजर्स आणि राजस्थान रॉयल्स दरम्यान झालेल्या मॅचवर बेटिंग सुरु होतं. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ही कारवाई केली.

या तीन बुकींकडून 20 मोबाईल, लॅपटॉप आणि काही महत्वाच्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. या आरोपींवर आय.टी.सी. ऍक्ट आणि इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट खाली गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या बुकींच्या अटकेनं महत्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे.

तर कल्याणमध्येही तीन बुकींना अटक करण्यात आलीय. कल्याणमधल्या बाजारपेठ इथल्या एका इमारतीत आयपीएलच्या क्रिकेट मॅचवर सट्टा लावला जात असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. यानंतर क्राईम ब्रांचचे सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रमोद पाटील आणि त्यांच्या टीमनं कारवाई करत तीन सट्टेबाजांना अटक केली.

चेतन भानुशाली, केवल भानुशाली आणि सचिन तेली अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं असून त्यांच्याकडून एलसीडी, लॅपटॉप आणि मोबाईल जत्प करण्यात आले आहेत. या तिघांचा मुंबईतील काही बुकींशी संबंध असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरु आहे.

close