‘जावईबापू’ अटकेत, ‘सासरेबुवां’ची गच्छंती ?

May 25, 2013 9:41 AM0 commentsViews: 7

मुंबई 25 मे : आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणी बीसीसीआय अध्यक्ष एन श्रीनिवासन यांचा जावई गुरुनाथ मय्यप्पन यांना मध्यरात्री अटक झाली. मय्यप्पन यांना अटक झाल्यानंतर श्रीनिवासन यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागलीय. श्रीनिवासन यांनी स्वेच्छेने राजीनामा दिला नाही तर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली.

बीसीसीआयमधील एक गटाने श्रीनिवासन यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. त्यामुळे त्यांची गच्छंती होणार हे मानलं जातंय. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी आयपीएलमधल्या फायनलनंतर बीसीसीआय सदस्यांची बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत श्रीनिवासन यांच्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

जगातलं सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड म्हणून ओळख असलेल्या बीसीसीआयची श्रीनिवास यांच्यामुळे प्रतिमा खराब होत असल्यानं त्यांनी राजीनामा द्यावी अशी मागणी जोर धरतेय. श्रीनिवासन यांनी राजीनामा दिल्यास बीसीसीआय अध्यक्षपदासाठी अरुण जेटली किंवा माजी अध्यक्ष शशांक मनोहर यांची नावं चर्चेत आहेत.

मी चूक केली नाही, मी राजीनामा देणार नाही – श्रीनिवासन

दरम्यान, एन श्रीनिवासन काही वेळापूर्वी मुंबईत दाखल झाले. मी कुठलीही चूक केली नाही आणि मी राजीनामा देणार नाही असं विमानतळाच्या बाहेर आल्यावर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले. मला राजीनामा द्यायला कुणीही भाग पडू शकत नाही असा दावाही त्यांनी केला. कायदा आपलं काम करेल आणि बीसीसीआय सर्व नियमांचं पालन करेल असंही ते यावेळी म्हणाले. आपला कोलकाता दौरा अर्धवट सोडून ते मुंबईत दाखल झाले.

close