तरीही फायनलवर कोट्यावधीचा सट्टा, 6 बुकी अटकेत

May 27, 2013 9:31 AM0 commentsViews: 12

मुंबई 27 मे : स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे काळवंडलेला आयपीएलचा सहावा हंगाम रविवारी संपला. पण तरीही शेवटच्या फायनल मॅचवर कोट्यावधीचा सट्टा लागला. या प्रकरणी मुंबई मधून आज 6 बुकींना अटक करण्यात आली आहे. 4 बुकींना देवनारच्या छेला मार्केट परिसरातून अटक झाली. तर 2 बुकींना घाटकोपरच्या 90 फीट रोड परिसरातून अटक करण्यात आली. या बुकींकडून 8 मोबाईल फोन आणि 4 लाख रूपये जप्त केले गेलेत. देवनार पोलिसांनी ही कारवाई केली. या सट्टेबाजांनी हे बेटिंग फायनल मॅचवर केलं असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.

स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे दररोज धक्कादायक माहितीसमोर येत असल्यामुळे आयपीएलची प्रतिष्ठ टराटरा फाडली गेली. राजस्थान रॉयल्सचे खेळाडून एस.श्रीसंत, अजित चंडिला आणि अंकित चव्हाण अटकेत आहेत. त्यांच्यापाठोपाठ अभिनेता विंदू दारा सिंगला अटक झालीय. विंदूच्या अटकेमुळे बॉलिवूड कनेक्शन तर उघड झालेच पण चेन्नई सुपर किंग्जचा सीईओ आणि बीसीसीआयचे अध्यक्ष श्रीनिवासन यांचा जावई मय्यप्पन गुरूनाथलाही अटक झाली. अखेरीस रविवारी आयपीएलचा हंगाम संपला पण शेवट्या मॅचवरही बुकींना कोट्यावधींचा सट्टा लावून पोलीस यंत्रणा आणि कायद्याच्या धाकाला केराची टोपली दाखवली.