नक्षलविरोधात कारवाईसाठी सरकारने कंबर कसली

May 28, 2013 10:29 AM0 commentsViews: 32

गडचिरोली 28 मे : नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी अत्याधुनिक शस्त्र आणि इतर साहित्य छत्तीसगडला पुरवले जातील, असं केंद्रीय गृहसचिव आर के सिंग यांनी स्पष्ट केलंय. नक्षलवादाविरोधातली लढाई थांबणार नसून ती तीव्र होईल असं सिंग यांनी सांगितलं. गडचिरोलीत आणि इतर ठिकाणी नक्षलवादी बॅकफूटवर आहेत, त्यामुळे स्वत:चं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी निर्दोषांना मारलं अशी टीका गृहसचिवांनी केली.

दरम्यान, काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर केलेल्या हल्ल्याची जबाबदारी गुडसा उसेंडी या नक्षलवादी नेत्यानं घेतलीय. तसं पत्रक त्यानं बीबीसीला पाठवलंय. उसेंडी हा नक्षलवाद्यांचा प्रवक्ताही आहे. नक्षलविरोधी सलवा जुडुमचे संस्थापक आणि काँग्रेसचे नेते महेंद्र कर्मा, तसंच प्रदेशाध्यक्ष नंदकुमार पटेल आणि माजी केंद्रीय मंत्री विद्याचरण शुक्ल हेच या हल्ल्याचे मुख्य लक्ष्य होते, असं नक्षलवाद्यांच्या पत्रात म्हटलंय. या हल्ल्यात निरपराध काँग्रेस कार्यकर्तेही मारले गेले याबद्दल नक्षलवाद्यांनी खेद व्यक्त केला.

close