‘फिक्सिंग प्रकरण अत्यंत धक्कादायक आणि निराशाजनक’

May 31, 2013 9:31 AM0 commentsViews: 45

मुंबई 31 मे : आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं मौन सोडलंय. या प्रकरणी त्यानं पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. स्पॉट फिक्सिंगचं प्रकरण हे अत्यंत धक्कादायक आणि निराशाजनक असल्याचं सचिननं म्हटलंय. चुकीच्या कारणांसाठी क्रिकेटची चर्चा होत असल्याबद्दलही त्याने दुःख व्यक्त केलंय.

सचिनची प्रतिक्रिया

"क्रिकेट चुकीच्या कारणांमुळे चर्चेत असतं, तेव्हा मी नेहमीच दुखावतो. गेल्या दोन आठवड्यांतल्या घडामोडी धक्कादायक आणि निराशाजनक आहेत. क्रिकेटपटू म्हणून आम्हाला शिकवण्यात येतं की, जा, लढा, तुमची उत्तम कामगिरी करा आणि योग्यरितीने खेळा. या कठीण परिस्थितीत, मैदानात खेळणार्‍या लहान मुलांपासून क्लब, राज्य आणि देशातर्फे खेळणार्‍या क्रिकेटपटूंप्रमाणेच मलाही विश्वास वाटतो की, याच्या मुळाशी जाण्यासाठी बोर्डाचे अधिकारी प्रामाणिक प्रयत्न करतील. लाखो चाहत्यांचा विश्वास जपला गेला पाहिजे, भारतीय क्रिकेट अभिमान आणि आनंद यांच्याशीच जोडले गेले पाहिजे. "

बीसीसीआयचे खजिनदार अजय शिर्केंनी काम करणं थांबवलं

दुसरीकडे बीसीसीआयचे खजिनदार आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष यांनी बीसीसीआयसाठी काम करण्याचं थांबवत असल्याचं जाहीर केलंय. पुण्यामध्ये पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. बोर्डावर होत असलेल्या आरोपांमुळे, बीसीसीआयची प्रतिमा डागाळतेय, त्यामुळे काम करणं थांबवत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मात्र, बोर्डाच्या आर्थिक कारभारात काही गडबड नसल्याचं ते म्हणाले. तर पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी या प्रकरणी काही टिप्पणी करण्यास नकार दिलाय. या प्रकरणी खेळ आणि राजकारणाची गल्लत होऊ नये अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

close