महापुरुषांबाबत आपण फार हळवे झालो आहोत का? (भाग 2 आणि 3)

February 12, 2009 6:52 AM0 commentsViews: 19

महापुरुषांबाबत आपण फार हळवे झालो आहोत का? (भाग 2 आणि 3)साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आनंद यादव यांच्या संत सूर्य तुकाराम या पुस्तकावरून नवा वाद निर्माण झाला आहे. या पुस्तकात संत तुकारामांचं चारित्र्य हनन केल्याचा आरोप वारकरी संप्रदायानं व्यक्त केला आहे. तर आनंद यादव आणि पुस्तकाचे प्रकाशक मेहता प्रकाशन यांनी माफी न मागितल्यास आंदोलन करण्याचा इशारा छावा संघटनेनं दिला आहे. आनंद यादव यांचं संत सूर्य तुकाराम हे संत तुकारामांच्या जीवनावरील पुस्तक. यात त्यांनी तुकारामाला एक सामान्य माणूस कल्पून त्यांचा जीवनपट दाखवला आहे. पण तुकारामांच्या वंशजांना मात्र त्यांची ही भूमिका मान्य नाही. तर वारकरी संघटनेचे प्रमुख बंडातात्या कराडकर सांगतात, या पुस्तकावर बंदी घालावी आणि शासनाने त्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवावा. या वादावरच होता आजचा सवाल महापुरुषांबाबत आपण फार हळवे झालो आहोत का? यावेळच्या चर्चेत भाग घेतला फीचर्स एडिटर ज्ञानदा, ज्येष्ठ विचारवंत आणि संतसाहित्य अभ्यासक प्रा. सदानंद मोरे, वारकरी रामदास महाराज जाधव, अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आनंद यादव यांनी.वारकरी रामदास महाराज जाधव म्हणाले, या कादंबरीत संत तुकारामाच्या बालपणाच्या गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत त्या चुकीच्या आहेत, महाराजांची लहानपणी विकृत लोकांबरोबर संगत होती हे शक्य नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार संत तुकारामांवर अगदी लहानपणापासून सुसंस्कार झाले होते म्हणून ते संत पदाला पोहचले. यावर आनंद यादव सांगतात, आधुनिक समाजाला संत काय होते.हे व्यवस्थित सांगितलं तर त्यांच्याबद्दल आदर अधिक वाढेल. काही लोक महापुरुषांविषयी अतिशयोक्तीने बोलतात हे चुकीचं आहे. संतानी सुद्धा आपल्या भावनावर मात करून ते कसे मोठे महापुरुष झाले. हे ही कादंबरी संपूर्ण वाचून लक्षात येईल.प्रा. सदानंद मोरे यांनी सांगितलं संत वाड:मयाबाबत आनंद यादवाचा अभ्यास कमी आहे. जे घडलं नाही यावर कल्पना विस्तार का करावा.लेखकाला स्वातंत्र्य असावं पण त्यानेही काही नैतिकता पाळली पाहिजे. आयबीएन-लोकमतच्या फीचर्स एडिटर ज्ञानदा म्हणाल्या, संतसूर्य तुकाराम ही सामान्य त-हेची कादंबरी आहे. परंतु ही कादंबरी जाळावी, त्या लेखकाचे पुतळे जाळणे यातून जे राजकारण केलं जातं आहे ते चुकीचं आहे. चर्चेच्या शेवटी आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे म्हणाले, वारकरी संप्रदाय हा उदारमतवादी आहे. त्यांनी जाळपोळी, बंदीची भाषा करणं म्हणजे त्या संप्रदयाच्या तत्वांना हरताळ फासण्यासारखं आहे. आनंद यादवांनी चुकीचं लिहलं असेल तर कायदेशीर मार्गाने त्याचा विरोध करता येतो. मात्र लोकशाहीचा गळा घोटला जाईल असं काहीही होता कामा नये. हिंसाचार होता कामा नये. 70 टक्के जनतेलाही असंच वाटतं की, महापुरुषांबाबत आपण फार हळवे झालो आहोत.

close