काँग्रेस नारायण राणेंच्या सहनशीलतेचा अंत पाहतेय का? ( भाग 1 )

February 13, 2009 7:10 AM0 commentsViews: 57

काँग्रेस नारायण राणेंच्या सहनशीलतेचा अंत पाहतेय का? ( भाग 1 )ठंडा करके खानेका ही काँग्रेसची नीतीच आहे. तर तापट स्वभाव अशी राणेंची ख्याती. मुख्यमंत्रीपदी नेमणूक न झाल्यामुळे त्यांनी तांडव केलं. पक्षश्रेष्ठीपासून हायकमांडवर त्यांनी भले बुरे बोल सुनावले. अनेकांना राणेंनी धमक्या दिल्या, तरी पुन्हा राणेंच पाऊल काँग्रेसच्या मांडवातच गेलं. पण आता दिल्लीतून राणेंबाबत चालढकल का होतेय? कोकणातला हा ढाण्या वाघ शांत का बसलाय? का काँग्रेस आता नारायण राणेंच्या सहनशीलतेचा अंत पाहतेय. यावरच होता आजचा सवाल काँग्रेस नारायण राणेंच्या सहनशीलतेचा अंत पाहतेय का? या चर्चेत भाग घेतला राणेसमर्थक माणिकराव कोकाटे, शिवसेना खासदार भारतकुमार राऊत आणि काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी.राणेसमर्थक माणिकराव कोकाटे म्हणाले, मी गेले 25 वर्षे काँग्रेसमध्ये होतो. काँग्रेसमधल्या अनेक नेत्यांना पक्ष कसा मोठा व्हावा यापेक्षा आपण स्वत: कसं मोठं होऊ याबद्दल विचार करताना दिसतात. त्यामुळे पक्षाचं मोठं नुकसान होत आहे. राणेंच्या विलंबामुळे अनेक पक्षांचं नुकसान होऊ शकतं. ते अनेक आमदार, खासदार पाडू शकतात. राजकारणात हेच महत्त्वाचं आहे. ते म्हणाले राणे संवेदनशील नेते आहेत त्यामुळे आता काँग्रेसनं हे ठरवायचं आहे की, राणेंना बाहेर काढावं की त्यांचा सन्मान करायचा.शिवसेना खासदार भारतकुमार राऊत यांनी सांगितलं, राणेंबाबत जे काही चाललं आहे ते काही नवखं नाही. ही काँग्रेसची जुनीच नीती आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या सारख्या नेत्यांना वाट पहावी लागली. राणेंमुळे काँग्रेसचं मोठं नुकसान होणार असं नाही. शिवसेना सोडल्यानंतर राणेंनी काही जागा काँग्रेसला मिळवून दिल्या त्यामुळे त्यांची किंमत वाढली. आता काँग्रेसशिवाय राणेंना दुसरा पर्याय नाही.काँग्रेसचे आमदार भाई जगताप म्हणाले, राणेंबाबत निर्णय वेळेवर होणं गरजेचं आहे. पण नारायण राणेंचा निर्णय हाय कमांड घेणार आहे. काँग्रेस मोठा पक्ष आहे. देशाच्या अनेक राज्यात अनेक प्रश्न असतात. राणेंची ताकद मोठी आहे हे नाकारता येत नाही. पण शरद पवारांनाही वाट पहावी लागली होती. त्यामुळे आता राणेंना अजून वाट पहावी लागेल.शेवटी आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे म्हणाले, अजूनही राणे समंजसपणा दाखवतात. पण राणेंच्या सहनशीलतेचा अंत झाला तर राजकारण वेगळं वळण घेऊ शकतं. आणि 86 टक्के लोकांनाही असंच वाटतंय की काँग्रेस नारायण राणेंच्या सहनशीलतेचा अंत पाहतेय.

close