अडवाणींचे राजीनामानाट्य संपले

June 11, 2013 7:07 PM0 commentsViews: 21

advani_BJPनवी दिल्ली 11 जून : भाजपमधलं गेल्या पाच दिवसांपासूनचं वादळ सध्यातरी शमलंय. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी काही वेळापूर्वीच माघार घेतलीय. त्यांनी तिन्ही पदांचे राजीनामे मागे घेतले आहे. भाजपमध्ये मोदी पर्वाची सुरूवात झाल्यामुळे अडवाणींनी ना’राजीनामा’ देऊ केल्यामुळे एकच खळबळ उडाली. अखेर एक दिवस चाललेल्या नाराजी नाट्यावर आता पडदा पडला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन अडवाणींची नाराजी दूर झाली असून त्यांनी राजीनामे मागे घेतले आहे अशी घोषणा केली.

लालकृष्ण अडवाणींची नाराजी दूर करण्यामागे सरसंघचालक मोहन भागवत यांची भूमिका महत्त्वाची ठरली. सरसंघचालक मोहन भागवत यांनी अडवाणींशी फोनवरून चर्चा केली. त्यांच्या सूचनेनंतर अडवाणींनी माघार घेतल्याचं बोललं जातंय. आज संध्याकाळी पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह आणि सुषमा स्वराज यांनी अडवाणींची भेट घेतली. अडवाणींशी झालेल्या चर्चेनंतर राजनाथ सिंह यांनी पत्रकार परिषदेत अडवाणींनी राजीनामे मागे घेतल्याचं जाहीर केलं. अडवाणींनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांकडे स्वतःहून लक्ष देणार असल्याचं राजनाथ म्हणाले. पण अडवाणी मात्र या पत्रकार परिषदेत आले नाहीत. अडवाणींची नाराजी दूर करण्यासाठी भाजपनं तडजोडीचा फॉर्म्युला तयार केला. त्यानुसार पंतप्रधानपदाचा उमेदवार अडवाणींच्या सहमतीशिवाय ठरवला जाणार नाही, असं आश्वासन पक्षानं अडवाणींना दिलंय.

close