‘आदिवासी खात्यात भ्रष्टाचाराची SIT मार्फत चौकशी करा’

June 13, 2013 1:19 PM0 commentsViews: 50

mumbai high coart13 जून : राज्यातल्या आदिवासी विकास विभागात झालेल्या भ्रष्टाचाराची स्पेशल इन्वेस्टिगेशन टीम म्हणजेच एसआयटीमार्फेत चौकशी करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. आदिवासींसाठी देण्यात आलेला विकास निधी त्यांच्यापर्यंत न पोचता अधिकार्‍यांनी त्यावर डल्ला मारल्याचा आरोप आहे. याविरोधात सामाजिक कार्यकर्ते बहिराम पोपटराम यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी झाली.

या प्रकरणी या गैरव्यवहारांचा आवाका प्रचंड असल्याने त्याचा तपास करण्यात सीबीआयने असमर्थता दाखवली आहे. त्यामुळे हा तपास एसआयटीकडे द्यावा अशी मागणी करण्यात आली होती. विशेष म्हणजे या घोटाळ्याची तक्रार खुद्द नवे आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांनीच केली होती. दुभत्या जनावरांच्या खरेदीची योजना आदिवासी विभागातर्फे राबवण्यात आली होती. पण त्यात मोठा घोटाळा झाला होता. बनावट लाभार्थ्यांना जनावरं दिल्याचं कागदोपत्री दाखवण्यात आलं होतं.

तर खर्‍या लाभार्थ्यांपर्यंत जनावरं पोचलीच नव्हती. या घोटाळ्याची दखल घेत 2005 मध्ये पिचडांनी तिथले आमदार या नात्यानं आदिवासी विकास आयुक्तांकडे या खुलासा मागितला होता. ते पत्र आयबीएन लोकमतच्या हाती लागलंय. आता आदिवासी विकास मंत्रालयाची सूत्रं खुद्द पिचड यांच्या हाती आल्यानं ते याबाबत खात्यांतर्गत काय भूमिका घेतात हे महत्त्वाचं ठरलंय.

close