लोकसहभागातून झालं नद्यांचं खोलीकरण !

June 13, 2013 5:32 PM0 commentsViews: 202

prakashvatराहुल पहुरकर, बुलडाणा

बुलडाणा 13 जून : पावसाला सुरूवात झाल्यानं दुष्काळाचं सावट तर दूर झालंय. पण आता पुन्हा पुढच्या वर्षी दुष्काळाचा सामना करावा लागू नये यासाठी काही ठिकाणी प्रयत्न सुरू आहेत. बुलडाण्यात काँग्रेस आमदार राहुल बोंद्रे यांच्या पुढाकारानं असाच एक उपक्रम हाती घेण्यात आला. विशेष म्हणजे सरकारच्या निधीशिवाय हे प्रयत्न केले जात आहे.

यंदा बुलडाणा जिल्ह्यालाही दुष्काळाचा चांगलाच तडाखा बसलाय. पण आता पुढच्या वर्षी परत हे संकट येऊ नये यासाठी आतापासूनच इथल्या गावकर्‍यांनी एकत्र येऊन प्रयत्न सुरू केलेत. आमदार राहुल बौंद्रे यांच्या पुढाकारानं या परिसरातल्या 22 नद्यांचा गाळ काढण्यात आला. विशेष म्हणजे शासनाच्या निधीशिवाय लोकसहभागातून हे प्रयत्न होत आहे.
या कामासाठी काही गावांतल्या लोकांनी तर तंटामुक्त गावासाठी मिळालेल्या पुरस्काराची रक्कमही देऊ केली. त्यांना काही पतसंस्था, स्वंयसेवी संस्थानांनी देखील हातभार लावला. यामुळे आता गावातल्या विहीरींना पाणी लागेल आणि पिण्याच्या तसंच शेतीसाठीच्या पाण्याची टंचाई जाणवणार नाही, असा दिलासा या गावकर्‍यांना वाटतोय.

दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागल्या तरी या दुष्काळानं लोकांना शहाणं देखील केलंय. बुलडाणा जिल्ह्यातल्या या गावकर्‍यांचा प्रयत्न हादेखील त्याच्यावर मात करण्यासाठी शिकवलेलं एक शहाणपणाच म्हणावा लागेल.

close