भ्रष्टाचाराचा ‘चिखल’ !

June 13, 2013 6:57 PM3 commentsViews: 745

dipti_raut_ibn_lokmat_nashik… पण तुझी बायकामुलं तुझ्या या पापात वाटेकरी होतील का? कळलाव्या नारदमुनींच्या प्रश्नानं अस्वस्थ झालेला वाल्या कोळी घरी गेला. बघतो तर काय, आपली बायकामुलं गाठोडी बांधण्यात गुंतलेली… आजवर वाटमारी करून जमवलेली सर्व माया त्यात कोंबत होती… पै पै करून जमवलेली काही कोटींची रोकड… घाम गाळून घडवलेले सोन्याचे दागिने, चांदीची भांडी…. ज्या ज्या वाटेवर पोस्टींग झाली तिथे खरेदी केलेल्या मालमत्तेच्या कागदपत्रांच्या फाईल्स… सारे कसे कोडबंद करून इनोव्हा गाडीत भरले जात होते… आश्वासन नजरेनं वाल्याकडे पाहून सांगत होती…. काळजी करू नका बाबा… पापबीप माहित नाही… तुमच्या मालमत्तेत आम्ही नक्कीच वाटेकरी आहोत..

 

महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला नाशिकमधील ती बातमीने संपूर्ण राज्यातील जनतेचे डोळे दिपले. दुपारीच अँटी करप्शनचा ट्रॅप झाल्याची बातमी आली होती. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या नाशिकच्या उत्तर विभागाच्या कार्यालयात लाचलुचपत विभागाचा छापा पडला होता. त्र्यंबकेश्वरचे शाखा अभियंता जगदीश वाघ यांना कार्यकारी अभियंता सतीश चिखलीकर यांच्यावतीने लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले होते. त्रक्रारदार होता सार्वजनिक बांधकाम विभागाचा एक ठेकेदार. २००९ मध्ये त्र्यंबकमध्ये बांधलेल्या एका रस्त्याचे बील मंजूर करण्यासाठी या दोन्ही अधिकाऱ्यांनी ६ टक्के या प्रमाणात त्यांच्याकडून २२ हजारांची लाच मागितली होती. अँटी करप्शनचा सापळा यशस्वी झाला. वाघ आणि चिखलीकर जाळ्यात अडकले. पण इथपर्यंत ही इतर बातम्यांइतकीच सामान्य बातमी होती. खरा क्लायमॅक्स पुढे सुरू झाला.

ऑफीसमधील सापळा यशस्वी झाल्यावर अँटी करप्शनच्या दुसऱ्या पथकाने चिखलीकरांच्या घरावर छापा टाकला तेव्हा लक्षात आले गुलमोहर या शासकीय निवासस्थानावर चिखलीकरांनी वेगळ्याच मोहरा पेरल्या होत्या. एका इनोव्हा गाडीत काही बॅगा भरल्या जात होत्या. कोडनंबरने बॅगा बंद करण्यात आल्या होत्या. नेमक्या त्याचवेळी पोलिसांचे पथक गुलमोहरवर पोहोचले आणि त्या इनोव्हाला ब्रेक लागले. गुलमोहरवर पोलीस पाच मिनिटे उशीरा पोहोचले असते तर ‘२२ हजारांची लाच घेताना कार्यकारी अभियंता अँटी करप्शनच्या जाळ्यात’ एवढी फक्त एक कॉलमी बातमी झाली असती. पण चिखलीकरांच्या घरावरील धाडीने तिला ब्रेकिंग बनविले. आणि त्यानंतर आठवडाभर चिखलीकर प्रकरणातील ब्रेकिंग बातम्यांना ब्रेक लागलाच नाही.

पहिल्या दिवशीच चिखलीकरांच्या घरात तब्बल २ कोटी ७५ लाख म्हणजे जवळजवळ पावणेतीन कोटी रुपयांची रोकड सापडली. तेवढेच सोन्याचांदीचे दागिने, हिरे, माणिके, चांदीची भांडी (ही कदाचित नाशिक पोस्टिंगमधील चिखलीकरांची गुंतवणूक असावी!) आणि तब्बल दोन ट्रँक भरून मालमत्तेच्या फाईल्स. एवढा मुद्देमाल नाशिकच्या अँटी करप्शन पथकापुढे कदाचित पहिल्यांदाच आला असावा. त्यामुळे त्यांच्यापुढचं आह्वान होतं ते या साऱ्याच्या पंचनाम्याचं. शेवटी नोटा मोजण्यासाठी बँकेतून मशीन मागिवण्यात आले. सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे व्हॅल्यूएशन काढण्यासाठी सराफांची टीम बोलवण्यात आली.  तोपर्यंत रात्रीचे बारा वाजले होते. संपूर्ण महाराष्ट्र वर्धापन दिनाचे स्वागत करीत होता तेव्हा राज्यातील एका महत्त्वाच्या खात्यातील जबाबदार अधिकाऱ्याच्या बेनामी संपत्तीचा हिशेब सुरू होता. मध्यारात्रीनंतर पंचनामा पूर्ण झाला, गुन्हा दाखल झाला आणि अटक करण्याची वेळ आली तेव्हा अपेक्षेप्रमाणेच चिखलीकर आणि वाघ दोघांच्याही तब्बेती बिघडल्या. दोघांना सीव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

१ मे उजाडला तोच भष्ट्राचाराच्या या चिखलाच्या बातमीने माखलेला. वर्धापनदिनासाठी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानिमित्ताने जिल्ह्याचे पालकमंत्री उपस्थित होते….स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आपल्या खात्यातील एक अधिकारी लाच घेताना पकडला जातो आणि त्याच्याकडे एवढी कोट्यावधींची माया सापडते… खात्याचे जबाबदार मंत्री म्हणून आपली यावर काय प्रतिक्रिया?….  मंत्रीमहोदयांचे शांत उत्तर… पोलिस त्यांचे काम करीत आहेत, ज्याने जसे केले असले तसे शासन त्याला होईल.

इकडे १२ तास उलटले तरी चिखलीकर आणि वाघ यांना अटक नव्हती. कारण काय तर तब्बेतीचे निमित्त. सिव्हीलचे जीने पायी उतरणाऱ्या आणि चालत गाडीपर्यंत जाणाऱ्या या दोन्ही अधिकाऱ्यांची तब्बेत ‘गंभीर’ असल्यामुळे सीव्हील हॉस्पिटलमधून त्यांना सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला रेफर केले गेले होते. तेथे त्यांना घेऊन जाण्यासाठीही सिव्हीलच्या दारात दोन खाजगी इनोव्हा उभ्या होत्या त्या ही पीडब्यूडीच्या ठेकेदारांच्याच. नेमक्या त्याचवेळी त्यांच्यावर नजर ठेऊन असलेल्या आयबीएन लोकमतच्या कॅमेरॅने हा पाहुणचार टिपला आणि सगळे सावध झाले. खाजगी इनोव्हाचे उघडलेले दार बंद झाले आणि खाजगी गाडीएवजी पोलिसांची गाडी बोलावण्यात आली आणि त्यात बसवून त्यांना सुपरस्पेशॅलिटीकडे नेण्यात आले. संध्याकाळी २४ तास उलटले तरी त्यांची गंभीर प्रकृती स्थीर होत नव्हती. शेवटी ‘लाचखोर अधिकाऱ्यांना अद्याप अटक नाही’ या बातम्यांचा भडीमार झाल्यावर त्यांची प्रकृती सुधारली, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आणि संध्याकाळी त्यांना अटक करण्यात आली.

दरम्यान, त्यांच्या उपस्थितीत त्यांच्या बँकांची लॉकर्स उघडण्याच्या कामाला सुरुवात झाली होती. लॉकर्स उघडण्यापूर्वीच मोठे घबाड सापडणार याची चर्चा सुरू झाली होती. पहिल्यांदा शिरपूर अर्बन कोआपरेटीव्ह बँकेतील लॉकर उघडले गेले. बँकेच्या बाहेरच मोठ्या अक्षरात बॅनर लावलेला – २४ तास तुमच्या सेवेत… भारतातील कोणत्याही एटीएममधून काढू शकता पैसे… आणि सर्व आकारात लॅकर्स उपलब्ध… बँकेच्या जाहिरातीलील ‘सर्व आकारात लॉकर्स’ या वैशिष्ट्याचा अर्थ चिखलीकरांचे लॉकर पाहिल्यावर लागला. तब्बल ५ तासांच्या पंचनाम्यानंतर चिखलीकरांच्या त्या एका लॉकरमधील मुद्देमाल बाहेर आलेला मुद्देमाल सगळ्यांच्याच डोळ्यात तेल घालणारा होता. घरातील घबाड आणि या एका लॉकरमधील घबाड असे मिळून तिसऱ्या दिवसापर्यंत चिखलीकरांकडे सापडले तब्बल ७ कोटी ५६ लाखांची कॅश आणि ४ किलो ५० तोळे सोने… दुसरीकडे जगदीश वाघच्याही एका लॉकरचा पंचनामा पूर्ण झाला होता.

वाघकडे सापडले ४७ लाख रोकड आणि १ किलो सोनं… सोन्याच्या वाढत्या भावाने जेरीस सामान्य लोक सध्या तोळ्यावरून ग्रॅमवर आलेत… अधिकाऱ्यांच्या लॉकर्समध्ये मात्र किलोत सोनं. त्यानंतर आता सुरू झालीए त्यांच्या मालमत्तेचा हिशेब. चिखलीकर यांच्या घरी ७८ फाईल्स सापडल्यात. त्यात २७ फाईल्स मालमत्तेच्या आहेत, ३७ आयकरच्या, विम्याच्या ६. जालना, औरंगाबाद, अहमदनगर… ज्या ज्या ठिकाणी चिखलीकरांचे पोस्टिंग होते त्या त्या ठिकाणी मालमत्ता केली. त्याशिवाय वाशी, पुणे या शहरांमध्येही गुंतवणूक केली.   आतापर्यंत त्यांच्या मालमत्तेसह संपत्ती झालीए १४ कोटींची. पण त्या फाईली खरेदीखताच्या आहेत आणि काळ्या पैशाचे व्यवहार करताना खरेदीखतात प्रत्यक्ष व्यवहारापैकी किती कमी रक्कम दाखविले जाते हे सर्वश्रृत आहे. शिवाय त्या खरेदीच्या किमती आहेत, या सर्व मालमत्तेचा आजच्या बाजारभावात हिशेब केला तर नक्कीच दुपट्टीच्या घरात जाऊ शकतो.

यातील काही मालमत्ता चिखलीकर यांची पत्नी आणि बहीण यांच्याही नावावर आहे. काही लॉकर्सही पत्नीच्या नावावर आहेत. त्यामुळे पत्नीचा जबाब गरजेचा होता. पण मुलांच्या परीक्षेचे कारण सांगून स्वाती चिखलीकरांनी अँटी करप्शनकडून शुक्रवारी दोन दिवसांची सवलत मागून घेतली. प्रत्यक्षात शनिवारी त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव कोआपरेटीव्ह बँकेतील खाते ऑपरेट केल्याचे पुढे आहे. पुढील तपासात अहमदनगरमध्येही चिखलीकरांची दोन खाती असल्याचे कळते.

चिखलीकर आणि वाघ या दोघांकडे आढळलेल्या चार गाड्यांची माहिती तोपर्यंत बाहेर आली होती. चारही गाड्या यांनी खरेदी केलेल्या असल्या तरी त्या त्यांच्या नावावर नव्हत्या. तर, धुळ्यातील एकाच माणसाच्या नावावर या चारही गाड्या असणे म्हणजे चिखलीकर आणि वाघ यांच्यातील या धंद्यातील भागीदारी स्पष्ट होते.

 

हे सारे सुरू असताना, बाहेरच्या प्रतिक्रियांचा कानोसा फारच सूचक होता. पीडब्ल्यूडी डिपार्टमेंटमध्ये चर्चा सुरू होती, साहेबांना उगाच अडकवले जातेय…कुणी म्हणत होते, वर देण्यासाठी ते हे घेत होते… त्यातले त्यांचे फक्त दोनच टक्के….ठेकेदार म्हणत होते, पीडब्यूडीमध्ये पैसे सगळेच घेतात…पण बिलं काढत होते ना ते महत्त्वाचं…कुणी म्हणत होते, पैसे कोण खात नाही, पण चिखलीकर साहेबांनी जरा जास्तच केले…
सामाजिक कार्यकर्ते म्हणत होते, ६ टक्के म्हणजे…. दिडशे कोटींची कामे… पण तेवढी कामे त्र्यंबकमध्ये दिसतात कोठे? विरोधक म्हणत होते, यशा राजा तथा प्रजा…
मंत्री म्हणत होते, मी चिखलीकरला ओळखतच नाही, असे ५०० कार्यकारी अभियंता पीडब्युडीत आहेत…
आणि त्यांना ओळखणारे लोक म्हणत होते…. कसं शक्य आहे…
ते चिखलीकर किती सज्जन गृहस्थ आहेत!

चिखलीकर यांची आतापर्यंत सापडलेल्या मालमत्तेपैकी काही तपशील

 

 • वाशीत दुकान – खरेदी ६८ लाख – १७, प्लाझा, सेक्टर १९ डी, क्षेत्रफळ – ६८१ चौ फूट
 • बाणेर प्लॉट – खरेदी २३ लाख – सर्व्हे नं. ११४, क्षेत्रफळ – ४९१ चौ मीटर
 • बालेवाडी प्लॉट – खरेदी १६ लाख, क्षेत्रफळ ६०० चौ मीटर
 • कोथरुड प्लॉट – खरेदी ३७ लाख, प्लॉट नं ८, सर्व्हे नं ७८, क्षेत्रफळ ४५१ चौ मीटर
 • नांदेड घर – २३ लाख
 • लोणी काळभोर – शेतजमीन – खरेदी ३ लाख, क्षेत्रफळ ४ आर
 • औरंगाबाद प्लॉट – मुकुंदवाडी, खरेदी ३९ लाख, क्षेत्रपळ ८ हेक्टर
 • औरंगाबाद फॅक्टरी – वळुंज एमआयडीसी, अभी इंजिनिअरिंग, खरेदी ६८ लाख, क्षेत्रफळ ६८ लाख
 • औरंगाबाद गाळे – क्षेत्रफळ १६ हजार चौ मीटर

 

- दीप्ती राऊत, ब्युरो चीफ, नाशिक

 • BBOY SPYKA

  mast aahe blog tuza

 • BBOY SPYKA

  दीप्ती राऊत tuza mota fan aahe mee

 • Prafull Mohod

  या सर्व प्रकरणाचे पुढे काय झाले. दीप्तीजी चीखालीकरण जमीन मिळाला का? संपत्ती ची काय विल्हेवाट लावली जाणार? मोठ्या माश्यांना का हात लावला जात नाही ? CBI चौकशी होणार आहे का ? असे कित्येक प्रश्न आहेत अशे प्रकरण ८ दिवस तापतात TV वर ब्रेंकिंग न्यूज गेतात पण पुढे सर्व आलबेल होते. या प्रकरणांच तू शेवट पर्यंत माग घ्यावा हीच आशा

close