आठवणीतला गिरणगाव – शाहीर मधुकर नेराळे, वैशाली गिरकर

November 1, 2008 9:28 AM0 commentsViews: 53

गिरणगाव म्हटलं की आजही डोळ्यांसमोर चित्र उभं राहतं, ते गिरण्यांवर धूर सोडणा-या उंचच उंच चिमण्यांचं. पण जागतिकीकरणाच्या स्पर्धेत, त्या आता नाहीशा होत चालल्या आहेत. गिरणगावची मराठमोळी संस्कृती संपूर्ण जगात पोहोचवण्यासाठी 'पुकार' या संस्थेने कंबर कसली आहे ती 'गिरणगाव महोत्सवा'चं आयोजन करून. 'पुकार' संस्थेचा 2आणि 3 नोव्हेंबर रोजी 'गिरणगाव महोत्सव' मुंबईतल्या परळमध्ये होत आहे. या 'गिरणगाव महोत्सवा'चं औचित्य साधून 'सलाम महाराष्ट्र'मध्ये गिरणगावाचा कायापालट पाहणारे, गिरणगाव संस्कृतीशी घनिष्ट नातं असणारे दोन पाहुणे आले होते. शाहीर मधुकर नेराळे आणि गिरणी कामगार वैशाली गिरकर. तेव्हाचा गिरणगाव आणि आताचा गिरणगाव आपल्या शाहिरीच्या माध्यमांतून लोकांपर्यंत पोहोचवणारे शाहीर मधुकर नेराळे यांनी गिरणगाव संस्कृतीबाबत बोलायला सुरुवात केली तेव्हा डोळ्यांसमोर गिरणगाव उभं राहिलं. शाहीर सांगतात ज्ञ् 'गिरणगाव ही एकप्रकारची संस्कृती आहे. शेवटी कोणतीही संस्कृती सगळं काही घडवत असते. माणसाचं जीवन घडवत असते. गिरणगावमध्ये 65 गिरण्या होत्या. त्यात तीन ते साडेतीन लाख गिरणी कामगार काम करायचे. ही परिस्थिती 40-50 वर्षांपूर्वीची आहे. या कामगारांमधले 90 टक्के कामगार मराठी होते. या सगळ्या कुटुंबांचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या दैनंदिन कामाला भोंग्याच्या तलावर सुरुवात व्हायची. आम्हाला कधी घड्याळ बघावंच लागलं नाही. भोंग्यावर दिवसांची कार्यवाही अवलंबून असायची.'शाहिरांचं बोलणं ऐकून वैशाली गिरकर यांच्याही जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. गिरणी कामगार असल्यामुळे वैशाली गिरकर यांनी संप, मोर्चा, आंदोलन या गोष्टी खूपच जवळून अनुभवल्या आहेत. वैशालीताई ज्या गिरणीत काम करायच्या ती गिरणी बंद पडल्यावर त्या गप्प बसल्या नाहीत. तर त्यांनी पोळीभाजी केंद्र उभारलं. या केंद्राच्या माध्यमातून त्यांनी स्वत: आणि इतर चार जणींच्या चरितार्थाचा प्रश्र सोडवला. वैशाली गिरकर सांगतात, 'आमचं तेव्हाचं गिरणगाव भोंगा संस्कृतीशी कटीबद्ध होतं. सकाळी 7.00 चा भोंगा वाजला की आम्हा गिरणीकामगारांची गिरणीकडे जाण्याची लगबग वाढायची. त्यानंतर जोतो आपापल्या डिपार्टमेंटमध्ये कामाला लागायचा. त्यानंतर जेवणाच्या सुटीचा भोंगा वाजायचा. आणि नंतर संध्याकाळी गिरणी सुटल्याचा भोंगा व्हायचा.' अशा खूपशा आठवणी वैशाली गिरकर आणि शाहीर मधुकर नेराळे यांनी सांगितल्या. शाहिरांनी पोवाडे गाऊन गिरणगावच्या आठवणींची लज्जत वाढवली. त्या आठवणी शेजारच्या व्हिडिओवर पाहता येईल.

close