चांद्रयानाच्या यशस्वी मोहिमेमुळं भारतीयांचा वैज्ञानिक दृष्टीकोन वाढेल का ? – भाग – 2

November 15, 2008 3:48 PM0 commentsViews: 15

भारताची चांद्रयान मोहीम यशस्वी झाली आहे. येत्या काही वर्षांत भारतीय अंतराळवीराचं पाऊल चंद्रावर ही पडेल. चांद्रमोहीम यशस्वी झाल्यानंतर देशभरात जल्लोष साजरा करण्यात आला. पण आजही समाजावर अंधश्रद्धेचा पगडा आहे. यावरच ' आजचा सवाल ' मध्ये चर्चा करण्यात आली. प्रश्न होता चांद्रयानाच्या यशस्वी मोहिमेमुळं भारतीयांचा वैज्ञानिक दृष्टीकोन वाढेल का ? यावर बोलण्यासाठी ज्येष्ठ कलावंत हेमू अधिकारी यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. अधिकारी हे बीएआरसीमध्ये शास्त्रज्ञ होते. जळगावहून सामाजिक कार्यकर्ते शेखर सोनाळकर आणि कोल्हापुरहून स्वामी राम कुंडल महाराज चर्चेत सहभागी झाले होते.या मोहिमेमुळे वैज्ञानिक दृष्टीकोन वाढेल का ? या प्रश्नाला उत्तर देताना हेमू आधिकारी म्हणाले की विज्ञानाची प्रगती आणि वैज्ञानिक दृष्टीकोन यात नातं नाही. त्यामुळे दृष्टीकोन वाढेल, असं नाही. डार्विनच्या उत्क्रांतीच्या सिंद्धाताला पुढील वर्षी 150 वर्ष पूर्ण होत आहे. पण अमेरिकेतील काही वर्गातील लोक आजही बायबलमधील उत्क्रांतीचा सिद्धांत मानतात. कोल्हापुरहून चर्चेत सहभागी झालेले राम कुंडल महाराज यांनी पुराणाचे दाखल दिले. विशिष्ट ज्ञान म्हणजे विज्ञान अशी व्याख्या त्यांनी केली. विज्ञानाचा संबंध यज्ञाशी असल्याचं सांगितलं. चर्चेच्या शेवटपर्यंत ते भूमिकेशी ठाम होते. याबाबत लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते शेखर सोनाळकर यांनी सांगितलं, स्वामीजींचं वक्तव्य विज्ञानविरोधी आहे. यज्ञातून चांद्रयान चंद्रावर पोहचलं का ? माणसाची प्रगती यज्ञामुळे झाली का ? तर नाही. हे सर्व मानवी कष्टामुळे झालं आहे. दोन हजार सालापूर्वीचं संस्कृतमधील विज्ञान होतं तर आपण याआधीच चंद्रावर का नाही पोहचलो ?'. हेमू अधिकारी यांनी शास्त्रीय दृष्टीकोन मांडला.' विज्ञानात आणि पुराणात गल्लत केली जातेय. पुराणातील वर्णन वैज्ञानिक पुरावे होऊ शकत नाही. आजही विज्ञान हा संस्कृतीचा भाग नाही. फार थोड्या शास्त्रज्ञांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन दिसून येतो. प्रयोगशाळेत शास्त्रज्ञ आणि बाहेर गुरू, स्वामींच्या चरणी पडतात, हे दिसून येतं. पोलमध्ये विचारण्यात आलेल्या चांद्रयानाच्या यशस्वी मोहिमेमुळं भारतीयांचा वैज्ञानिक दृष्टीकोन वाढेल का ? या प्रश्नावर 70 टक्के लोकांनी 'हो'असं मत नोंदवलं. चर्चेचा शेवट करताना आयबीएन लोकमत चे संपादक निखिल वागळे म्हणाले की चांद्रमोहिमेचा उपयोग वैज्ञानिक दृष्टीकोन वाढवण्यासाठी केला पाहिजे. कुंडल्या मांडण्यापेक्षा चंद्राचं आणि मानवाशी नातं काय ते समजून घेतलं पाहिजे. अंधश्रद्धेला हद्दपार केलं पाहिजे. बालवाडीपासून मुलांना वैज्ञानिक दृष्टीकोन देण्यास सुरूवात केली पाहिजे. तोच खरा शास्त्रज्ञाचा विजय असेल.

close