वाचाल तर ‘वाचाल’ (भाग – 1)

November 17, 2008 10:55 AM0 commentsViews: 27

14 ते 23 नोव्हेंबर दरम्यान राष्ट्रीय पुस्तक सप्ताह साजरा होतो आहे. त्यानिमित्तानं लेखक सुबोध जावडेकर यांना 'सलाम महाराष्ट्र'मध्ये आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यांनी 'सलाम महाराष्ट्र'मध्ये विविध विषयांवरच्या पुस्तकं आणि लेखकांवर गप्पा मारल्या. सुबोध जावडेकर व्यवसायाने इंजिनिअर कन्सल्टंट आहेत. पवई आयआयटीतून त्यांनी केमिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतलीय. त्यांची विज्ञानविषयक 12 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या 'कुरूक्षेत्र' या कथासंग्रहाला कोठावळे पुरस्कार मिळाला आहे. तसंच साहित्य क्षेत्रातल्या कार्याबद्दल त्यांना तीन राज्य पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. पूर्वीपासून आतापर्यंतच्या वाचनसंस्कृतीचा धांडोळा घेतल्यास एक बाब अशी लक्षात येते की वाचन संस्कृतीत भरपूर बदल झाले आहेत. एकूणच वाचन संस्कृतीबद्दल सुबोध जावडेकर सांगतात – "वाचन कमी झालंय अशी ओरड ऐकू येते पण ते काही तितकसं खरं नाही. कारण कोणत्याही लोकसंख्येमध्ये वाचणारी माणसं ही त्या एकूण लोकसंख्येपेक्षा कमीच असतात. पूर्वी लोकं धामिर्क तसंच अध्यात्मिक साहित्य भरपूर वाचायचे. आजही ते वाचत आहे. पाकशास्त्र, पाककलेवरची पुस्तकं वाचण्याकडेही वाचकांचा कल जास्त आहे. आजकाल तर व्यक्तिमत्त्वविकास, यशस्वी उद्योजक कसे व्हाल, अशी वेगळ्या वाटेवरची पुस्तकं वाचण्याकडे वाचक आकृष्ट होत आहेत. साक्षरतेचा परिणाही वाचन संस्कृतीवर होत आहे, असं मत त्यांनी मांडलं. "2 ते 3 वर्षांपूर्वी भारतसरकारने एक सर्व्हे केला होता. त्या सर्व्हेमध्ये चौथीच्या 4 ते 5 लाख मुलांना स्वत:चं पूर्ण नावही नीट लिहिता येत नव्हतं. जर अशी परिस्थिती असेल तर वाचन संस्कृती वाढेल अशी अपेक्षातरी कशी करावी? दृकश्राव्यमाध्यमाचा वाचन संस्क़तीवर परिणाम होत आहे. त्यामुळे दृकश्राव्य माध्यमाचा उपयोग करून वाचनसंस्कृती कशी वाढेल यावर उपाययोजना करायला हवी," असं ते म्हणाले.

close