वाटचाल एका जिद्दीची (भाग : 1)

December 3, 2008 8:17 AM0 commentsViews: 5

3 डिसेंबरच्या जागतिक अपंगदिनानिमित्त ' सलाम महाराष्ट्र 'मध्ये बालश्री पुरस्कार विजेत्या मनश्री सोमणशी गप्पा मारण्याची संधी मिळाली..जन्मत:च दोन्ही डोळ्यांनी दिसत नसूनही त्याचा बाऊ न करता ज्या जिद्दीनं मनश्रीनं त्यावर मात केली आहे ती खरोखरीच वाखाणण्यासारखी आहे. तिचं सर्व शिक्षण हे सर्वसामान्य मुलांच्या शाळेत झालं आहे. मनश्रीची उत्तुंग झेप म्हणजे बालश्री पुरस्काराची प्राप्ती. मोठ्या कर्तृत्ववान लोकांना जसा पद्मश्री पुरस्कार दिला जातो तसा लहान मुलांना बालश्री पुरस्कार दिला जातो. क्रिएटीव्ह परफॉर्मन्स, सायन्स, रायटिंग आणि आर्ट या चार विभागात तो पुरस्कार दिला जातो. मनश्रीला तो क्रिएटिव्ह परफॉर्मन्ससाठी दिला गेला आहे. सलाम महाराष्ट्रमध्ये मनश्रीने तिचा संगीताचा आणि बालश्री पुरस्काराचा प्रवास सांगितला. ' सलाम महाराष्ट्र ' अजीत जोशी उपस्थित होते. ते गेली 43 वर्ष व्हायोलिन वाजवत आहेत. वयाच्या 12 व्या वर्षी त्यांची दृष्टी गेली. घरची परिस्थिती अत्यंत बिकट होती. या सगळ्यांवर मात करून ते आज जिद्दीने उभेआहेत. पहिला कार्यक्रम वयाच्या 14 व्या वर्षी त्यांनी सादर केला आणि मधमास सारंग हा राग वाजवून रसिकांची वाहवा मिळवली होती. ' सरींवर सरी ' हा त्यांचा विनायक जोशी आणि मृदुला दाढे-जोशींसोबतचा कार्यक्रम खूप गाजला आहे. वयाच्या 12 व्या वर्षी दृष्टी गेलेल्या अजीत जोशींना त्यांच्या आजोबांनी गोंदोलेकर महाराजांचं चरित्र वाचून दाखवलं. ते चरित्र त्यांच्यासाठी इतकं प्रेरणादायी ठरलं की त्यांनी ठरवलं की परत रडत बसायचं नाही. गणतीच्या मुर्ती बनवण्याची, चित्र काढण्याची आवड असणारे जोशी आपल्या वडिलांच्या आग्रहाखातर व्हायोलीन वाजवायला शिकले. आज ते एक उत्तम व्हायोलीन वादक म्हणून प्रसिद्ध आहेत. व्हायोलीनच्या सुरांनी ते इतरांची मन रिझवत आहेत.जागतिक अपंगदिना निमित्त मतिमंद मुलांसाठी चालवल्या जाणार्‍या केंद्राच्या शिक्षिका संजीवनी फडके ' सलाम महाराष्ट्र ' मध्ये आल्या होत्या. संजीवनी फडके शिक्षिका असणा-या मंतिमंद मुलांचं केंद्र सुहृद मंडळ आणि NDA या दोन्हींच्या समन्वयानं चालवलं जातं. NDA च्या सहकार्याने चालवलं जाणारं हे महाराष्ट्रातलं पहिलचं केंद्र आहे. मतिमंद मुलांचं शिक्षण आणि पुनर्वसन या केंद्रामार्फत केल्या जातं. मतिमंद मुलांना थोड्या प्रमाणात का होईना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणं, त्यांना निदान स्वत:च्या उपजिविकेपुरतं तरी कमावता यावं या दृष्टीनं त्यांना स्वत:च्या पायावर उभ राहायला शिकवणं हे काम संजीवनी फडके करत आहेत. संजीवनी फडके यांच्यावर सेवाभावी वृत्तीचे संस्कार झाले ते त्यांच्या आईवडिलांमुळे. या सेवाभावी वृत्तीमुळे आज त्या मंतिमंदमुलांना घडवण्याचं काम सक्षमपणे करत आहेत. या तिघांच्या जिद्दीचे अनुभव व्हिडिओवर ऐकता येतील.

close