नागपूरच्या कार्गो हबला मंदीची झळ

January 13, 2009 7:29 AM0 commentsViews: 3

13 जानेवारी, नागपूरप्रशांत कोरटकरसगळीकडे सध्या मंदीची लाट सुरू आहे या मंदीची झळ नागपुरात होत असलेल्या मिहान कार्गो प्रकल्पालाही बसलीय. एक तर नवी गुंतवणूक नाही आणि दुसरं म्हणजे शेतक-यांच्या जमिनीचा प्रश्न यामुळे प्रकल्पाची गती मंदावली आहे. गुंतवणूक रखडल्यानं मिहान कार्गो प्रकल्पाची गती मंदावली आहे. महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी म्हणजे एम.ए.डी.सी.नं मिहान प्रकल्पात गुंतवणुकीसाठी मोठमोठ्या कंपन्यांना निमंत्रणं दिली. त्यापैकी एच.सी. एल. टेक्नॉलॉजी, विप्रो, ताज समूह, डी एलएफ, बोईंगसारख्या कंपन्यांनी इथं जागा घेतली. पण गुंतवणुकीची गाडी यापुढे सरकली नाही. विदर्भातील ड्रीम प्रोजेक्ट समजल्या जाणा-या या प्रकल्पात एम.ए.डी.सी.नं एक हजार कोटींचा खर्च केला आहे. पण प्रत्यक्षात गुंतवणूक झाली ती 600 कोटींची. आणि आता तर ती गुंतवणूक जवळ जवळ थांबली आहे. आधीच उल्हास आणि त्यात फाल्गुन मास अशी या प्रकल्पाची परिस्थिती झाली आहे. एम.ए.डी.सी. चे उपाध्यक्ष आर सी सिन्हा सत्यम घोटाळ्यातल्या मेतास प्रॉपर्टीचे अध्यक्ष होते. मात्र काहींच्या मते या प्रकल्पावर याचा परिणाम होणार नाही. "सत्यमचा परिणाम मिहानवर होणार नाही. पण जागतिक मंदी आणि इतर गोष्टींचा विचार करता त्यातून मार्ग काढायाल हवा. हाच यावरचा तोडगा आहे. तरच मिहान प्रकल्प यशस्वी होईल, "असं भाजपचे नेते नितीन गडकरींचं म्हणणं आहे. मिहान प्रकल्पाच्या कामाचा वेग वाढवण्यासाठी नागपूर विमानतळ राज्य सरकारच्या हातात यायला हवं. त्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून केंद्र आणि राज्याचा खो खो चा खेळ सुरू आहे. "काही काम व्हायच नक्कीच आहे. ते काम अडणार नही. आम्ही लवकर लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत. शक्य तेवढ्या लवकर काम मार्गी लावणार आहोत. बाँल आता राज्यसरकारच्या कोर्टात आहे. " असं नागरी हवाई वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल म्हणाले. मिहान प्रकल्पात 33 हजार कोटींच्या गुंतवणुकीचं राज्य सरकारचं स्वप्न आहे. पण त्यासाठी लवकर कार्यवाही केली नाही तर विदर्भातल्या रखडलेल्या इतर प्रकल्पांसारखीच याचीही अवस्था होऊ शकते. त्यामुळेच कार्गो प्रकल्पाचं भवितव्य अंधारात आहे.

close