औरंगाबादच्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात

January 13, 2009 6:08 AM0 commentsViews: 5

13 जानेवारी, औरंगाबादमाधव सावरगावे" आम्हाला पाण्याचा भरपूर त्रास होत आहे. या पाण्याचा परिणाम लोकांच्या आरोग्यावरही होत आहे.या पाण्यामुळं आम्ही वैतागून गेलो आहोत, " ही व्यथा आहे सुभद्राबाई म्हस्के या आजीबाईंची. त्या औरंगाबादच्या वाळूंज परिसरात राहतात. औरंगाबादजवळच्या वाळूज परिसरातल्या केमिकल कंपन्याचा त्रास शेतकर्‍यांबरोबरच वाळूजकरांनाही सहन करावा लागत आहे. केमिकल कंपन्यातलं पाणी खोलवर गेल्यानं पिण्यासाठी शुद्ध पाणीही नागरिकांना मिळत नाहीये. शिवाय वायू प्रदूषणामुळे आरोग्याचा धोकाही निर्माण झालाये. कामगारांनाही या कंपन्या त्रासदायक ठरत आहेत. त्यामुळं या कंपन्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी रस्त्यावर उतरायचं ठरवलं आहे. केमिकल कंपन्यांमुळे वाळूज परिसरातल्या नागरिकांना पिण्यासाठी हिरवंगार पाणी वापरावं लागत आहे. वाळूज महानगर परिसरात भरमसाठ वाढलेल्या केमिकल कंपन्याचा तो परिणाम आहे. केमिकल झोन नसतानाही नियम बाजूला ठेऊन परवानगी दिल्यानं पाणी तसंच हवा प्रदूषणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. वाळूज महानगरात छोट्यामोठ्या अशा दोन हजारांपेक्षा जास्त कंपन्या आहेत. कंपन्यांतले कामगार मोठ्या प्रमाणात बाहेरून येऊन स्थायिक झालेयत. आता प्रदूषणाच्या विळख्यामुळे त्यांच्यासमोर जगण्याचा प्रश्न निर्माण झालाये. " दूषित पाण्यामुळं मुलांच्या आंगावर पुरळ आल्या आहेत. मलाही तोच त्रास होत आहे. डॉक्टरांनी जागा बदला असं सुचवलंय. पण नव-याची नोकरी असल्यामुळं तसं काहीच करता येत नाहीये," असं छाया पाटील म्हणााल्या.औरंगाबादच्या प्रदूषण हटाव समितीचे अध्यक्ष शरद कीर्तीकर यांनी या समस्येवर खूप लढा दिलाये. मात्र नियम डावलणार्‍या कंपन्यांवर कुठलीच कारवाई झाली नाही. " औरंगाबादमधल्या बेकायदेशीर केमिकल कंपन्यांमुळे लोकांचं आरोग्य धोक्यात तर आलंच आहे. पण याचा फटका कामगारांनाही बसत आहे. एमएमआरडीए तर्फे शुद्ध पाणी पुरवलं जातं. त्या पाण्याच्या टॅक्स लोकांकडून घेतला जातो. तर अशा पाण्याच्या टॅक्स लोकांकडून घेतला जाऊ नये अशी आम्ही एमएमआरडीएला विनंती करणार आहोत, " असं शरद कीर्तीकर म्हणाले. वाळूज महानगर परिसरात एकापाठोपाठ एक अशा अनेक कंपन्या आल्या. त्यांचा विकासही झाला. मात्र कंपन्या सुरू करताना कंपन्यांनी पोलुशन कंट्रोल बोर्डाच्या नियमाचं पालन केलं नसल्यामुळंत्रास सहन करावा लागत आहे. धनदांडग्या लोकांच्या कंपन्यांनी शेतकर्‍यांना अडचणीत आणलं..आता याच कंपन्या कामगारांनाही त्रासदायक ठरू लागल्यायेत. त्याचा तोडगा लवकरात लवकर निघावा यासाठीही प्रयत्न चालू आहेत.

close