बेकायदा भूखंडांवर औरंगाबाद पालिकेची कारवाई

January 13, 2009 11:29 AM0 commentsViews: 3

13 जानेवारी, औरंगाबादसंजय वरकडऔरंगाबादमधल्या कोट्यवधी रूपयांच्या घोटाळ्यातील भूखंड आणि अत्यल्प दरानं व्यवसासाठी दिलेल्या जागा, ताब्यात घेण्यासाठी महापालिकेनं तीन महिन्यांचा कालावधी निश्चित केला आहे. आयबीएन लोकमतनं गेल्या पंधरा दिवसांत तीन मोठे घोटाळे उघड केल्यानंतर या हालचालींना वेग आलाय. औरंगाबादमधला, क्रांतीचौकातला शंभऱ कोटीहून अधिक रकमेचा भूखंड घोटाळा आयबीएन लोकमतनं उघडकीला आणला. त्या प्रकरणातल्या पाच महत्वाच्या जागा ताब्यात, घेण्याची कारवाई सुरू झालीये. तर इतर जागा महिनाभरात ताब्यात घेण्यात येणार आहेत. "आयबीएन लोकमतनं लावलेल्या भूखंड घोटाळ्यातील पाच जागांवर तातडीनं ताबा घेण्यात येणार आहे. इतर जागा महिनाभरात ताब्यात घेऊ. या जागांवर यापुढं कुणी व्यवहार केलेत तरी ते नियमबाह्य ठरणार आहेत." असं महपालिका आयुक्त दिलीप बंड यांनी स्पष्ट केलं.याशिवाय विवेकानंद महाविद्यालय परिसरातील पाच कोटींचा भूखंड घोटाळा आणि शहरातल्या मोक्याच्या जागा,अत्यल्प दरात भाड्यानं दिल्याचं प्रकरणंही आयबीएन लोकमतनं पुढं आणलं. त्याबाबतही तीन महिन्यात कारवाई करण्यात येणार आहे. "आज अशी परिस्थिती आहे की जागांचे रेकॉर्ड सापडत नाहीत. त्यामुळं येत्या तीन महिन्यात या जागांचा ताबा घेण्यासाठी सर्व रेकॉर्ड अद्यवावत करावेत, लीज संपलेल्या असतील तर त्या जागा ताब्यात घ्याव्यात, असे आदेश मी प्रशासनाला दिले आहेत." असं औरंगाबाद महापालिकेच्या महापौर विजया रहाटकर यांनी सांगितलं.गुप्तधनावर बसलेल्या नागासारखी औरंगाबाद महापालिकेतील भूखंड घोटाळ्यांची अवस्था आहे. हे धन ताब्यात यावं असं प्रत्येकाला वाटतं, पण नागाला बाजूला करायचं कुणी हा खरा प्रश्न आहे. महापालिकेनं आता कारवाईसाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. पण त्या तडीस लागणार का याकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे.

close