इशरत जहाँ बनावट एन्काउंटरमध्ये राजिंदर कुमार सहभागी ?

June 14, 2013 7:09 PM0 commentsViews: 384

नवी दिल्ली 14 जून : इशरत जहाँ बनावट चकमकी प्रकरणी गुप्तचर विभागाचे अधिकारी चांगलेच अडचणीत आलेत. गुप्तचर विभागाचे स्पेशल डिरेक्टर राजिंदर कुमार यांचा या बनावट चकमकीत सक्रीय सहभाग होता, हे सीबीआयच्या तपासात उघड झालंय अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलीय.

गुजरात पोलिसांनी 9 वर्षांपूर्वी केलेल्या चकमकीत मुंबईतली तरुणी इशरत जहाँ आणि इतर तिघांचा मृत्यू झाला. याप्रकरणी आता गुप्तचर विभागच अडचणीत आलाय आणि रडारवर आहेत 2004 मध्ये गुजरातमध्ये कार्यरत असलेले गुप्तचर विभागाचे विद्यमान स्पेशल डिरेक्टर राजींदर कुमार…सीबीआय कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे. सूत्रांनी सीएनएन-आयबीएनला दिलेल्या माहितीनुसार गुजरात पोलीस आणि गुप्तचर विभागातल्या अधिकार्‍यांनी कशापद्धतीनं ही चकमक घडवून आणली, हे सीबीआय तपासात उघड झालंय.

Ishrat Jahan

- सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राजिंदर कुमार यांनी गुजरात पोलिसांना इशरत जहाँची नुसती माहिती दिली नाही तर या चकमकीत त्यांचा सक्रीय सहभाग होता
- गुप्तचर विभागानेच इशरत आणि तिच्या तीन मित्रांना अटक केली आणि बेकायदेशीरपणे त्यांना तीन दिवस कोठडीत ठेवलं.
- चकमकीच्या आदल्या दिवशी या सर्वांना वलसाड टोल प्लाझाजवळ गुजरात पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं.
- इशरतजवळ जी ए. के. 47 आणि इतर शस्त्रं सापडली तीसुद्धा कुमार यांनी दिली होती.
- आणि ज्या दिवशी ही चकमक झाली त्या दिवशी कुमार यांनी गुजरातच्या मुख्यमंत्री ऑफिसमध्ये तब्बल 37 कॉल केले होते.

याच प्रकरणातले आणखी एक आरोपी आणि गुजरातचे माजी पोलीस अधिकारी जी. एल. सिंघल यांच्या चौकशी दरम्यान सीबीआयला कुमार यांच्या सहभागाची माहिती मिळाली. सीबीआयने न्यायदंडाधिकार्‍यांसमोर सिंघल यांचा कबुली जबाब नोंदवलाय. त्यामुळे हा कबुलीजबाब कोर्टात पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाईल. हे प्रकरण सीबीआय आणि गुप्तचर विभाग यांच्यातही तणाव निर्माण करणारा ठरलाय. सीबीआय संचालकांनी त्यात हस्तक्षेप करावा लागलाय. ते म्हणतात…

– राजिंदर कुमार यांच्याविरोधात आमच्याजवळ पुरेसे पुरावे आहेत. याच पुराव्यांच्या आधारे कुमार यांना समन्स बजावण्यात आलेत.

दुसरीकडे सीबीआयच्या तपासावर भाजपही नाराज आहे. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना फसवण्याचा हा कट असल्याचा आरोप भाजपकडून होतोय.
सीबीआयचा तपास शेवटच्या टप्प्यात पोचलाय.त्यामुळे आता लवकरच सत्य समोर येईल, अशी आशा इशरतच्या कुटुंबीयांना वाटतेय.

गुजरात सरकारला हायकोर्टाने फटकारले

गुजरात हाय कोर्टाने आज इशरतच्या चकमकीवरून गुजरात सरकारला चांगलंच फटकारलंय. या बनावट चकमकीच्या तपासात राज्य सरकार अडथळे आणत असल्याचे कोर्टाने म्हटलं आहे. आयपीएस अधिकारी सतीश वर्मा यांच्या नेतृत्त्वाखील चौकशी करायला गुजरात सरकारनं विरोध केला होता. सीबीआयचा तपास अंतिम टप्प्यात आल्याचं सीबीआयनं कोर्टात सांगितलं. त्यानंतर आरोपपत्र दाखल करण्यात येईल. या बनावट चकमकी प्रकरमणी सीबीआयने आयबीचे विशेष संचालक राजिंदर कुमार आणि अहमदाबादचे तत्कालीन पोलीस आयुक्त के आर कौशिक यांची चौकशी केलीय. अतिरिक्त पोलीस महासंचालक पी पी पांडे यांना अटक करायचा विचारही सीबीआय करतंय.

close