सत्यम घोटाळ्याच्या तपासाला वेग

January 13, 2009 4:42 PM0 commentsViews: 2

13 जानेवारी, हैदराबादसत्यमच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पंतप्रधानांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीला माजी अर्थमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री पी चिंदंबरम, वाणिज्य मंत्री कमलनाथ आणि कंपनी व्यवहार मंत्री प्रेमचंद गुप्ता हजर होते. दरम्यान सत्यम घोटाळ्याचा आता सरकारतर्फे सखोल तपास केला जाणारेय आणि हा तपास सिरियस फ्रॉड इन्वेस्टिगेशन ऑफिसनं हातात घेतलाय. सत्यमच्या घोटाळ्याप्रकरणी सरकारकडे आज पहिलाच ऑफिशिअल रिपोर्ट पाठवला गेलाय. या रिपोर्टमध्ये सत्यमच्या बॅलन्सशीटमध्ये मोठी अफरातफर झाल्याचं म्हटलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र आताच या रिपोर्टचे तपशील जाहीर करण्यास कंपनी व्यवहार मंत्री प्रेमचंद गुप्ता यांनी नकार दिलाय. सत्यम घोटाळ्याच्या तपासात आता खुद्द सरकारनंच लक्ष घातल्यामुळे तपासाला वेग आलाय. हा तपास एसएफआयओ म्हणजे सिरियस फ्रॉड इन्वेस्टिगेशन ऑफिसकडे सुपूर्द करण्यात आलाय. दरम्यान एसएफआय ला काम सोपवल्यानंतर त्यांच्या आठ सदस्यांची टिम त्वरीत हैदराबादला रवाना झालीय. सत्यमचे ऑडिटर प्राईसवॉटर हाऊस फर्मचीही चौकशी होणार आहे.या रिपोर्टमधली माहिती सरकारनं जाहीर केली नसली तरी तपास तीन महिन्यात पूर्ण होईल असं गुप्ता यांनी सांगितलंय. आज हैदराबादमध्येही सीआयडीच्या अधिकार्‍यांनी सत्यमची ऑडिटर फर्म प्राइसवॉटर हाउसच्या ऑफिसवर धाड टाकली. सत्यम घोटाळ्यात आता आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे. सत्यमचे कार्यवाहक सीईओ राम मैनामपती यांनाही अटक होण्याची शक्यता आहे.सत्यमच्या काही क्लाएन्ट्सना भेटण्यासाठी मैनामपती सध्या अमेरिकेत असल्याचं सांगितलं जातंय. मात्र मैनामपती यांना अटक होऊ नये म्हणून सीआयडीवर प्रचंड दबाव असल्याचंही बोललं जातंय. याचबरोबर आयएसबीचे माजी डीन राम मोहन राव आणि सत्यमच्या बोर्डाचे सदस्य आणि माजी कॅबिनेट सचिव टी.आर. प्रसाद यांनाही अटक होण्याची शक्यता आहे.

close