रिव्ह्यु : फुकरे

June 15, 2013 9:12 PM0 commentsViews: 587

समीक्षक अमोल परचुरे

‘फुकरे’ हा आहे एक पंजाबी शब्द… दिल्ली आणि पंजाब भागात सर्रास वापरला जाणारा हा शब्द… जी माणसं बढाया तर खूप मारतात पण वेळ येते तेव्हा पळून जातात, अशा पळपुट्यांना ‘फुकरे’ असं म्हटलं जातं. ‘गर्जेल तो बरसेल काय’ या मराठी म्हणी प्रमाणेच फुकरे या शब्दाचा वापर होतो. असेच चार फुकरे या सिनेमात आहेत. पैसे कमावण्यासाठी हे चौघेजण झोल आणि जुगाड करायचा शॉर्टकट वापरतात आणि त्यात फसत जातात अशी साधारण गोष्ट आहे. दिल्लीचा बॅकड्रॉप असलेले अशाच प्रकारचे सिनेमे गेल्या काही वर्षात रिलीज झालेले आहेत. त्या सिनेमांमध्ये हा फुकरे नक्कीच सरस ठरेल असा आहे. पण काही सिनेमे असे असतात की, जे बघून जेव्हा आपण बाहेर पडतो तेव्हा आपल्या मनात विचार असतो, ‘अजून मजा करता आली असती’… फुकरे बघून अगदी असंच वाटतं..

fukrey movie review
काय आहे स्टोरी ?
हनी, दिलीप, लाली आणि जफर… या चौघांची एकमेकांशी ओळख होते आणि त्यांच्या लक्षात येतं सगळ्यांची गरज एकच आहे. कमी वेळात पैसा कमावणं…यासाठी ते भोली पंजाबन म्हणजेच रिचा चढ्ढा हिची मदत घ्यायचं ठरवतात. भोली पंजाबन म्हणजे सगळ्या प्रकारचे काळे धंदे करणारी एक डॉनच असते. त्यात हनी आणि दिलीपना एक दैवी देणगी असते. हनीला जे स्वप्न पडतं त्याचा अर्थ लावून दिलीप त्यातून एक आकडा बनवतो आणि त्यादिवशी जर तो आकडा लावला तर लॉटरी नक्की…हीच स्कीम ते भोली पंजाबनला सांगतात आणि तिच्याकडून पैसे मिळवतात. या स्कीमचं पुढे काय होतं, त्यात हे चौघे कसे फसत जातात ही धमाल बघायला मिळेल फुकरे या सिनेमात…या फुकरेमध्ये दिल्ली शहराचा वापर एखाद्या व्यक्तिरेखेसारखा झालाय. दिल्लीचे रस्ते, तिथली माणसं, दिल्ली मेट्रो यामुळे सिनेमाच्या कथेला अनुकूल वातावरण तयार झालेलं आहे.
का पाहावा ?
फुकरे हा सिनेमा म्हणजे एकदम फनराईड आहे…खळखळून हसायला लावतील असे अनेक प्रसंग यात आहेत. पण यात काही महत्त्वाच्या त्रुटी म्हणजे हिरो-हिरोईन ट्रॅकमुळे घुसडण्यात आलेली गाणी ज्यामुळे काही ठिकाणी सिनेमाचा वेग खूपच कमी होतो. अशाप्रकारच्या सिनेमांमध्ये हिरो-हिरोईन अशी पारंपरिक रचना टाळता आली असती. हा भाग उपरा वाटत असल्यानेच प्रिया आनंदसारख्या सुंदर अभिनेत्रीला फारसा वावच राहिलेला नाही. प्रत्यक्ष कथेला सुरुवात होण्यापूर्वी पात्रांची ओळख होण्यातसुद्ध खूप वेळ गेलाय, पण एकदा रिचा चढ्ढाची एंट्री झाली की फुल्ल टू धमाल सुरु होते. यातील सर्वच कलाकारांनी मस्त आणि फ्रेश अभिनय केलाय, कारण मुख्य भूमिकेतले सगळे ‘फुकरे’ हे तसे नवीन आहेत. पुलकित सम्राट, वरुण शर्मा, मनजोत सिंग, अली फझल या चारहीजणांनी मस्त धमाल केलीये. मृगजीतसिंग लांबा या दिग्दर्शकाकडून आता येणार्‍या काळात आणखी धमाल सिनेमांची अपेक्षा करायला हरकत नाही.
‘फुकरे’ला रेटिंग – 60

close