निवडणुकीच्या रिंगणात प्रियंका नाही !

January 14, 2009 5:16 AM0 commentsViews: 3

14 जानेवारी, उत्तरप्रदेश आगामी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात केवळ राहुल गांधीच नव्हे तर प्रियंका गांधीनींही उतरावं, अशी उत्तर प्रदेशातल्या काँग्रेस नेत्यांची इच्छा आहे. पण, प्रियंकानं ही मागणी धुडकावून लावलीय. निवडणुकीत केवळ राहुल गांधी यांना मदत करण्याची इच्छा असल्याचं त्यांनी म्हटलंय. गांधी घराण्यावर काँग्रेसची प्रचंड श्रद्धा आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात काँग्रेसला पुन्हा सोनेरी दिवस दाखवायचे असतील तर गांधी घराण्याशिवाय पर्याय नसल्याचं नेत्यांचं मत आहे. म्हणूनच प्रियंका गांधींनी उत्तरप्रदेशातून निवडणूक लढवावी, अशी मागणी पुढं आलीय. प्रियंका यांचं सासर मोरादाबाद यासाठी परफेक्ट मतदारसंघ असल्याचं काँग्रेसच्या नेत्यांना वाटतंय. याशिवाय उत्तर प्रदेश काँग्रेसनं प्रियंका यांच्यासाठी आणखी काही योग्य मतदारसंघांची यादी बनवली आहे. प्रियंका यांनी मात्र याला नकार दिला आहे. " मी माझ्या आई आणि भावाच्या मतदार संघाचं प्रतिनिधित्त्व करण्यासाठी इथे आले आहे, " असं प्रियंका गांधी म्हणाली. उत्तरप्रदेशात काँग्रेस आणि समाजवादी पक्षात जागावाटपावर चर्चा सुरू असताना ही मागणी पुढं आलीय. समाजवादी पक्ष लोकसभेच्या जागांची घोषणा करत आहे. खासकरून ज्या जागांवर काँग्रेसचा डोळा आहे, नेमक्या त्याच जागा समाजवादी पक्ष घोषित करतंय. समाजवादी पक्षाच्या या कुरघोडीला प्रियंका गांधी नेमकं उत्तर असल्याचं काँग्रेसमधल्या अनेक नेत्यांना वाटतंय. पण प्रियंका गांधी यांना सक्रीय राजकारणात येण्यापेक्षा आपली आई आणि भावाच्या पाठीमागं समर्थपणं उभं राहण्यात जास्त रस आहे.

close